Nashik Bribe : चाळीसगावचा उपविभागीय अभियंता लाच घेताना नाशिकला गजाआड | पुढारी

Nashik Bribe : चाळीसगावचा उपविभागीय अभियंता लाच घेताना नाशिकला गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा येथील क्लस्टर विकासाचे चार कोटी आणि अतिरिक्त सुरक्षेची अनामत रक्कम ३५ लाख रुपये देण्याच्या मोबदल्यात चार लाख रुपयांची लाच घेणारा चा‌ळीसगावचा उपविभागीय अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. ज्ञानेश्वर पंढरीनाथ विसपुते (५७, रा. अशोकनगर, धुळे) असे संशयिताचे नाव असून, न्यायालयाने बुधवार (दि.२०)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. (Nashik Bribe)

संबधित बातम्या : 

डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी रुरबन योजनेतून पातोंडा समूहात क्लस्टर विकसित करण्याचे काम तक्रारदाराने हाती घेतले आहे. त्या कामापोटी ४ कोटी ८२ लाख रुपये रक्कम तक्रारदारास मंजूर झाले होते. यासह अतिरिक्त सुरक्षा अनामत रकमेपोटी भरलेले ३५ लाख रुपये मिळवण्यासाठी तक्रारदाराने विसपुतेकडे संपर्क साधला होता. ही रक्कम देण्याच्या मोबदल्यात विसपुतेने तक्रारदाराकडे पाच लाख रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. दरम्यान, विसपुते हा शनिवारी घरगुती कार्यक्रमानिमित्त नाशिकला आला असता त्याने तक्रारदाराकडे पुन्हा लाचेची मागणी करीत गडकरी चौक परिसरात पैसे घेऊन बोलवले होते. विभागाने सापळा रचून विसपुते यास लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लवकरच सेवानिवृत्ती

संशयित विसपुते याचे कार्यालय चाळीसगावात असून, धुळे येथे घर आहे. मात्र, नाशिक शहरात त्याने लाच स्वीकारली. काही महिन्यांनी संशयित सेवानिवृत्त होणार होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाने विसपुतेच्या घराची झडती सुरू केली आहे. घरझडतीत व बँक खात्यात अद्याप आक्षेपार्ह संपत्ती आढळली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button