लेकराला वाचवताचा आईचाही बुडून मृत्यू | पुढारी

लेकराला वाचवताचा आईचाही बुडून मृत्यू

गडहिंग्लज ः पुढारी वृत्तसेवा :  भडगाव (ता. गडहिंग्लज) येथे खणीमध्ये बुडणार्‍या लेकराला वाचवताना आईचाही बुडून मृत्यू झाला. रविवारी (दि. 17) दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. सुजाता सिद्धाप्पा पाटील (वय 35) व मल्लिकार्जुन सिद्धाप्पा पाटील (10) अशी मृतांची नावे आहेत.

सुजाता हिचा विवाह कर्नाटकातील कुरणी येथे झाला होता. पतीच्या निधनानंतर ती आपल्या दोन मुलांसह माहेरीच राहात होती. किल्ले सामानगड रोडवर असलेल्या क्रशरनजीक त्यांचे घर असून रविवारी दुपारी दोनच्या सुमारास क्रशर खणीत ती कपडे धुण्यास गेली होती. काही वेळानंतर तिचा लहान मुलगा मल्लिकार्जुन हा सायकल घेऊन खणीकडे गेला. यावेळी त्यांच्यासोबत मामाची लहान मुलगीही होती.

सुजाता धुणे धूत असताना मल्लिकार्जुन पाण्यात उतरून आंघोळ करत होता. पुढे पाण्याची पातळी खोलवर असल्याने त्याला अंदाज आला नाही व तो गटांगळ्या खाऊन बुडू लागला. सुजाता त्याला वाचविण्यास धावली. मात्र दहा फुटांहून अधिक खोली असल्याने ते दोघेही बुडाले. ही घटना या लहान मुलीने पाहिली होती. तिने धावतच घरी जाऊन सुजाता यांच्या वडिलांना ते दोघे बुडल्याचे सांगितले. त्यानंतर वडिलांनी या ठिकाणी धाव घेतली. पण दोघेही बुडाले होते.

संबंधित बातम्या

घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेतली. नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात आक्रोश केला. काही तरुणांनी खणीतून मृतदेह बाहेर काढले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले.

Back to top button