20 वर्षांनंतर आढळला हाताने चालणारा मासा | पुढारी

20 वर्षांनंतर आढळला हाताने चालणारा मासा

टास्मानिया : ऑस्ट्रेलियातील टास्मानिया प्रांतात एक विचित्र मासा आढळून आला आहे. हा आकर्षक हँडफिश असून नावाप्रमाणेच ही प्रजाती चालण्यासाठी हाताचा वापर करते. असे मानले जाते की, ही प्रजाती लुप्त झाली आहे आणि 20 वर्षांपूर्वी या प्रजातीतील शेवटचा मासा पाहिला गेला होता. पण, कॉमनवेल्थ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च ऑर्गनायझेशनने (सीएसआयआरवो) या माशाचा एक व्हिडीओ टि्वट केला असून अद्याप ही प्रजाती टिकून असल्याचा पुरावा दिला आहे.

मिररने दिलेल्या रिपोर्टनुसार, हा मासा केरी मारे या महिलेला आढळून आला. ही महिला प्रिमरोज सँडस टाऊन येथे एका समुद्र किनार्‍यावर धावत होती. याचवेळी तिची नजर एका विचित्र माशावर पडली. केरीला देखील हा मासा पाहून आश्चर्याचा धक्का बसला. कारण, हा मासा चक्क हाताने चालत होता. लुप्त होत असल्याने अति दुर्मीळ मानल्या जाणार्‍या या प्रजातीत केवळ 2 हजार मासे शिल्लक राहिले आहेत. याचा यापूर्वी सीएसआयआरवोने उल्लेख केला होता.

सीएसआयआरवोचे पदाधिकारी कार्ली डीवाईन याबाबत बोलताना म्हणाले, ‘हा मासा आढळून येण्याआधी आम्ही ही प्रजाती आता लुप्त झाली आहे, असेच मानत होतो. कारण, 2005 पूर्वी केव्हा तरी हा मासा आढळून आला आणि त्यानंतर कित्येक वर्षे आम्ही प्रयत्न करुन देखील आम्हाला हा मासा सापडत नव्हता. आता मात्र आम्हाला नव्याने शोध घेण्यासाठी नवा उत्साह लाभला आहे’.

Back to top button