नाशिक : ट्रकने जोरदार धडक दिल्याने आयशर घुसला थेट मिठाईच्या दुकानात | पुढारी

नाशिक : ट्रकने जोरदार धडक दिल्याने आयशर घुसला थेट मिठाईच्या दुकानात

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

मालेगावकडून नाशिककडे जाणाऱ्या मालवाहू आयशरला पाठीमागच्या बाजूने भरधाव येणाऱ्या ट्रकने धडक दिल्यााने आयशर ट्रक पेट्रोलपंप चौफुली येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील दुभाजकाला धडकून तो महामार्गालगत असलेल्या मिठाईच्या दुकानात घुसला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुकानाचे मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

संबधित बातम्या :

याबाबत वृत्त असे की, शनिवारी सकाळी मालेगावकडून नाशिककडे जाणाऱ्या आयशर ट्रक (यूपी ३०, बी ४१२५) जात असताना पाठीमागच्या बाजूने भरधाव येत असलेल्या ट्रकच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून तो आयशर ट्रकला धडकला. ही धडक इतकी जबरदस्त होती की, आयशर ट्रक दुभाजकावर आदळून तो उलट दिशेने महामार्गाच्या रस्त्यालगतच्या मिठाईच्या दुकानात घुसला. हा अपघात शनिवारी (दि.१६) सकाळच्या सुमारास घडला. सुदैवाने यावेळी मिठाईच्या दुकानात कोणी नव्हते यामुळे मोठा अनर्थ टळला. ट्रक दुकानात येत असल्याचे पाहून मिठाई दुकानाचे मालक व कारागीर यांनी जीव मुठीत घेऊन दुकानाबाहेर पळ काढला. तर धडक देणारा ट्रक चौफुली ओलांडून दुसऱ्या बाजूस उभा करण्यात चालकाला यश आले. यामुळे पुढील अनर्थ टळला. यावेळी सोमा टोलच्या अपघात विभागाने तत्काळ मदतकार्य करत ट्रक मिठाईच्या दुकानातून बाहेर काढला. या अपघातात दोन ट्रक, एक मोटारसायकल, मिठाई दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक कैलास वाघ, सहायक पोलिस उपनिरीक्षक रवींद्र जाधव, पोलिस उपनिरीक्षक कैलास चौधरी, पोलिस हवालदार चंद्रकांत निकम, भाऊसाहेब गुळे, विजय जाधव, सूळ, सुनील जाधव आदींनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे.

हेही वाचा :

Back to top button