नाशिक : वरुणराजाच्या आगमनाने गणेशभक्तांचा आनंद द्विगुणित | पुढारी

नाशिक : वरुणराजाच्या आगमनाने गणेशभक्तांचा आनंद द्विगुणित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक शहर व परिसरात सलग दुसऱ्या दिवशी (दि.१७) वरुणराजाने हजेरी लावली. सुट्टीचा मुहूर्त साधत गणरायाच्या स्वागताच्या तयारीसाठी घराबाहेर पडलेल्या गणेशभक्तांची काहीकाळ धावपळ ऊडाली. पण, पावसाच्या आगमनाने भक्तांचा आनंद द्विगुणित झाला. दरम्यान, जिल्ह्यातही ठिकठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली.

संबधित बातम्या :

गेल्या दोन दिवसांपासून नाशिकमध्ये पावसाने कमबॅक केले आहे. शहर व परिसरात रविवारी (दि. १७) देखील पावसाने हजेरी लावली. दिवसभरात हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. तर सायंकाळी पाचच्या सुमारास अर्धा तास जोरदार सरी बरसल्या. त्यानंतरही रात्री उशिरापर्यंत शहराच्या मुख्य भागासह उपनगरांमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. त्यामुळे गणेशोत्सवाच्या तयारीकरिता सहकुटुंब घराबाहेर पडलेल्या नाशिककरांची धांदल ऊडाली. पावसापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी आडोसा शोधला. दुसरीकडे रस्त्याच्या कडेला पुजा साहित्य व गणेश आरासासाठीचे साहित्य विक्री करणाऱ्या छोट्या-मोठ्या विक्रेत्यांनाही पावसाने दणका दिला. दरम्यान, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना पावसाच्या पाण्यापासून आरास वाचविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. शहरात दिवसभरात ४.२ मिमी पर्जन्याची नोंद करण्यात आली.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. अन्य तालूक्यांच्या तुलनेत त्र्यंबकेश्वर, इगतपूरी, पेठ व सुरगाणा या तालूक्यांमध्ये पावसाचा जोर काहीसा अधिक होता. वरूण राजाच्या आगमनाने ग्रामीण भागातील जनता सुखावली आहे. तसेच खरीपाच्या अखेरच्या टप्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात यंदाच्या हंगामात १ जूनपासून ते आजतागायत ५०५ मिमी पर्जन्याची नोंद करण्यात आली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत ५४ टक्के पाऊस झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात पुढील तीन दिवस ग्रीन अलर्ट असून याकाळात हलक्या सरी बरसतील, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button