

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया चषकाच्या फायनलमध्ये ऐतिहासिक विजय मिळवत भारतीय संघाने विश्वचषकासाठी जोरदार दावेदारी सादर केली आहे. आशिया चषक २०२३ च्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव केला आहे. टीम इंडियाने आठव्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. या बाबतीत श्रीलंका सहा विजेतेपदांसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारतीय संघाने अंतिम सामन्यात एकतर्फी विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने केवळ ५० धावा केल्या. भारताने एकही विकेट न गमावता अवघ्या ३७ चेंडूत लक्ष्य गाठले. वन-डे सामना हा १०० षटकांचा असतो. मात्र, हा सामना २१.३ षटकांमध्येच संपला आहे.
आजच्या विजयानंतर टीम इंडियाच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद झाली आहे. जाणून घेऊयात भारताने आजच्या सामन्यानंतर कोणते कोणते विक्रम आपल्या नावावर केले आहेत?… (Asia Cup Final 2023)
भारताने एकदिवसीय क्रिकेटमधील कोणत्याही स्पर्धेच्या अंतिम फेरीत २६३ चेंडू शिल्लक ठेऊन सर्वांत मोठा विजय मिळवला. भारताने हा सामना २६३ चेंडू शिल्लक असताना जिंकला. त्याच्या आधी ऑस्ट्रेलियाने २००३ मध्ये तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडचा २२६ चेंडू बाकी असताना पराभव केला होता.
या आशिया चषकात भारताने दुसऱ्यांदा १० गडी राखून विजय मिळवला. याआधी टीम इंडियाने नेपाळचा १० विकेट्सच्या फरकाने पराभव केला होता. संघाने एकूण दहाव्यांदा एकदिवसीय सामन्यात १० गडी राखून विजय मिळवला. भारताने वेस्ट इंडिजच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली. वेस्ट इंडिजने १० एकदिवसीय सामनेही १० विकेट्सने जिंकले आहेत. (Asia Cup Final 2023)
मोहम्मद सिराजने ७ षटकात २१ धावा देत ६ बळी घेतले. त्याने एक षटक मेडनही टाकले. आशिया चषकाच्या इतिहासातील ही कोणत्याही भारतीयाची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. त्याच्या आधी फिरकीपटू अर्शद अय्युबने १९८८ मध्ये पाकिस्तानविरुद्ध २१ धावांत ५ बळी घेतले होते. चायनामन गोलंदाज कुलदीप यादवनेही याच आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध २५ धावांत ५ बळी घेतले होते.
मोहम्मद सिराजने श्रीलंकेविरुद्ध सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम केला. त्याने पाकिस्तानच्या वकार युनूसचा विक्रम मोडला. वकारने १९९० मध्ये शारजाहच्या मैदानावर २६ धावांत ६ बळी घेतले होते. श्रीलंकेविरुद्ध ६ विकेट घेणारा सिराज दुसरा भारतीय ठरला. त्याच्या आधी आशिष नेहराने २००५ मध्ये ५९ धावांत ६ बळी घेतले होते.
मोहम्मद सिराज आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात ६ बळी घेणारा दुसरा खेळाडू ठरला. त्याच्या आधी श्रीलंकेच्या अजंथा मेंडिसने २००८ मध्ये भारताविरुद्ध १३ धावांत ६ विकेट घेतल्या होत्या. तर सिराजने वनडे फॉरमॅटमधील कोणत्याही स्पर्धेच्या अंतिम फेरीत चौथी सर्वोत्तम गोलंदाजी केली. त्याच्या आधी पाकिस्तानच्या आकिब जावेदने १९९१ मध्ये भारताविरुद्ध ३७ धावांत ७ बळी घेतले होते. त्याच्यानंतर अनिल कुंबळेने १२ धावा आणि अजंथा मेंडिसने १३ धावांत ६-६ विकेट घेतल्या होत्या.
मोहम्मद सिराजने डावात अवघ्या १६ चेंडूत ५ विकेट पटकावल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत ५ बळी घेण्याच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली. त्याच्याआधी श्रीलंकेच्या चामिंडा वासनेही बांगलादेशविरुद्ध १६ चेंडूंत ५ बळी घेतले होते. वासने २००३ मध्ये अशी कामगिरी केली होती.
मोहम्मद सिराजने पहिल्या डावातील चौथ्या षटकात ४ धावांत ४ बळी घेतले. एकदिवसीय सामन्यात एकाच षटकात ४ बळी घेणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. जगातील केवळ ३ गोलंदाजांना एका षटकात ४ विकेट्स घेता आल्या आहेत. सिराजशिवाय पाकिस्तानच्या मोहम्मद सामीने ३००२ मध्ये आणि इंग्लंडच्या आदिल रशीदने २०१९ मध्ये ही कामगिरी केली होती.
श्रीलंकेचा संघ १५.२ षटकांत अवघ्या ५० धावा करुन बाद झाला. ही धावसंख्या कोणत्याही स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील सर्वात लहान धावसंख्या आहे. यापूर्वी २००० मध्ये तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारताला ५४ धावांत ऑलआउट केले होते. टी-२० फॉरमॅटच्या अंतिम सामन्यातही ही सर्वात लहान धावसंख्या आहे. २०१७ मध्ये डेझर्ट कप फायनलमध्ये आयरलैंडचा संघ ७१ धावांत ऑलआऊट झाला होता. (Asia Cup Final 2023)
९. आशिया चषकाच्या अंतिम सामन्यातील सर्वात कमी धावसंख्या (Asia Cup Final 2023)
आशिया कप फायनलमध्ये सर्वात लहान धावसंख्येचा विक्रमही श्रीलंकेच्या नावावर आहे. यापूर्वी हा विक्रम भारताच्या नावावर होता. २००८ मध्ये श्रीलंकेविरुद्ध १७३ धावा करून टीम इंडिया ऑलआऊट झाली होती. यापूर्वी आशिया कप फायनलमध्ये श्रीलंकेची सर्वात कमी धावसंख्या १९८८ मध्ये आली होती. त्यानंतर भारताविरुद्ध १७६ धावा करून संघ ऑलआऊट झाला.
वनडेमध्ये कोणत्याही संघाची सर्वात छोटी धावसंख्याही भारताविरुद्धच बनली होती. श्रीलंकेपूर्वी बांगलादेशचा संघ २०१४ मध्ये मीरपूरच्या मैदानावर ५८ धावा करून ऑलआऊट झाला होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेकडे कोणत्याही संघाची सर्वात लहान धावसंख्या आहे. २००४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध ३५ धावा करून संघ ऑलआऊट झाला होता. (Asia Cup Final 2023)
११. चेंडूंच्या बाबतीत सर्वात लहान एकदिवसीय अंतिम
टाकलेल्या चेंडूंच्या बाबतीत भारत आणि श्रीलंका यांच्यातील सर्वात लहान एकदिवसीय सामना झाला. आशिया कप फायनलमध्ये फक्त १२९ चेंडू खेळले गेले. भारताने ३७ चेंडू खेळले तर श्रीलंकेने ९२ चेंडू खेळले. सर्वात लहान वनडेनुसार हा सामना तिसऱ्या क्रमांकावर राहिला. २०२० मध्ये नेपाळ आणि अमेरिका यांच्यातील एकदिवसीय सामना अवघ्या १०४ चेंडूत संपला. २००१ मध्ये श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यातील एकदिवसीय सामना केवळ १२० चेंडूंमध्ये पूर्ण झाला होता. (Asia Cup Final 2023)