कुर्ला स्थानकावर प्रवाशाला हृदय विकाराचा झटका; रेल्वे सुरक्षा दल जवानाच्या सतर्कतेमुळे वेळीच उपचार | पुढारी

कुर्ला स्थानकावर प्रवाशाला हृदय विकाराचा झटका; रेल्वे सुरक्षा दल जवानाच्या सतर्कतेमुळे वेळीच उपचार

कुर्ला; पुढारी वृत्तसेवा : रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानाने हृदय विकाराचा झटका आलेल्या प्रवाश्याला सतर्कता दाखवत सीपीआर दिल्याने त्याचा जीव वाचला. मुकेश यादव असे या आरपीएफ जवानाचे नाव आहे. कुर्ला रेल्वे स्थानकावर ही घटना घडली.

गुरुवारी (दि. १४) सकाळी अकरा वाजता कुर्ला रेल्वे स्थानकातील हार्बर मार्गाच्या फलाट क्र. ७/८ वर घडली. चेंबूरच्या घाटलामध्ये रहाणारे निलेश केमले (वय ४५) हे हार्बर मार्गावर लोकलमध्ये प्रवास करीत असताना अस्वस्थ झाले म्हणून कुर्ला रेल्वे स्थानकात उतरले. फलाटावर उतरताच ते बेशुद्ध झाले.ही घटना पाहणारे आरपीएफ जवान मुकेश यादव त्यांच्या सहकाऱ्यांसह त्यांच्या मदतीले धावले.मुकेश यांनी तत्काळ त्यांना सीपीआर देण्यास सुरूवात केली.सीपीआर मुळे बेशुद्ध झालेले निलेश थोडे शुद्धीवर आले. आरपीएफ जवान मुकेश यांनी इतर सहकारी, लोहमार्ग पोलीस यांच्या मदतीने त्यांना कुर्ला येथील पालिकेच्या भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

ही सर्व घटना फलाटावर असलेल्या सिसिटीव्हीमध्ये आणि फलाटावरील प्रवाश्यांच्या मोबाईलमध्ये ही कैद झाली आहे.वेळेत सीपीआर दिल्याचा रुग्णाला फायदा झाला असून त्याचे प्राण वाचल्याचे डॉक्टरांनी आरपीएफ च्या अधिकाऱ्यांना सांगितले.आरपीएफ जवान मुकेश यादव यांनी समय सुचकता दाखवत सीपीआर देऊन एका प्रवाश्याचा जीव वाचविल्याने त्याचे कौतुक होत आहे.

Back to top button