Eknath Khadse : सरकारमध्ये तिसरा भिडू आल्याने शिंदे गटाची डोकेदुखी वाढली: एकनाथ खडसे | पुढारी

Eknath Khadse : सरकारमध्ये तिसरा भिडू आल्याने शिंदे गटाची डोकेदुखी वाढली: एकनाथ खडसे

जळगाव: पुढारी वृत्तसेवा: भाजप- शिंदे गटाच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाने तिसरा भिडू सामील झाल्याने शिंदे गटाची डोकेदुखी वाढली आहे. आपल्याकडील मंत्रिपदे राष्ट्रवादीच्या वाट्याला जातील, याची धास्ती शिंदे गटाला असल्याने मंत्रिमंडळात नव्याने सामील होणाऱ्या शिंदे गटाच्या आमदारांमध्ये मोठी अस्वस्थता आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे  (Eknath Khadse) यांनी केला आहे. बोदवड शहरातील बाजार समिती संचालक मंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार दिवसेंदिवस लांबणीवर जात आहे. यावरुन एकनाथ खडसे  (Eknath Khadse) म्हणाले की, एक वर्ष उलटूनही शिंदे-फडणवीस सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार अजून झालेला नाही. यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटाची मोठी कोंडी होत आहे.

Eknath Khadse : गिरीश महाजनांचा आरोग्यदूत गुटखाकिंग

भाजप नेते गिरीश महाजन यांचा आरोग्यदूत तुषार जगताप हा ‘गुटखाकिंग’ असून, त्याच्याकडून जामनेर तालुक्यातील नेरी, नांद्रा यासह परिसरात दर आठवड्याला दहा, बारा लाखांचा गुटखा विकला जातो, असा आरोपही आमदार खडसे यांनी केला. तसेच महाजन यांचे दुसरे नाशिकचे सहकारी कोष्टी याच्यावरही मोक्का लावण्यात आला आहे. महाजन यांच्या आशीर्वादाने अनेक गुन्हेगार जिल्ह्यात सेटल होत असल्याचे खडसे म्हणाले.

शासकीय कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त

जिल्ह्याचे ग्रामविकासमंत्री असताना बहुतांश तालुक्यात शासकीय कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. एकट्या बोदवड तालुक्यात ३८ ग्रामपंचायती असून यात ४९ गावे आहेत. तालुक्यात केवळ १४ ग्रामसेवक आहेत. शासकीय कार्यालयाची बिकट परिस्थिती आहे. या रिक्त पदांबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर बोललो असता शिक्षक भरती आठ दिवसांत होणार असल्याचे सांगण्यात आले, परंतु अद्याप निर्देश प्राप्त झालेले नाहीत, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button