Nashik : बिल्डर्सवर भरवसा नाय काय? दस्त नोंदणीला अल्प प्रतिसाद | पुढारी

Nashik : बिल्डर्सवर भरवसा नाय काय? दस्त नोंदणीला अल्प प्रतिसाद

नाशिक : सतीश डोंगरे

फ्लॅट किंवा घर खरेदीची नोंदणी बिल्डरच्या कार्यालयामध्येच करता यावी याकरिता नोंदणी आणि मुद्रांक विभागाने राज्यभरातील बांधकाम व्यावसायिकांना ई-रजिस्ट्रेशन प्रणाली उपलब्ध करून दिली. मात्र, त्यास ग्राहकांचा अल्प प्रतिसाद मिळत असून, सह किंवा उपनिबंधक कार्यालयातच दस्त नोंदणीला ग्राहक प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांचा बिल्डर्सवर भरवसा नाही काय, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित केला जात आहे.

मालमत्ता दस्त नोंदणी करताना बऱ्याचदा सर्व्हर डाउन, गर्दी या समस्यांचा सामना करताना ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो. ग्राहकांबरोबरच बांधकाम व्यावसायिकांनाही या प्रक्रियेतून जावे लागत असल्याने, वेळ आणि पैशांचा अपव्यय होतो. या सर्व बाबींचा विचार करून राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयातच ई-रजिस्ट्रेशनची प्रक्रिया उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला. राज्यातील एक हजारांपेक्षा अधिक बांधकाम व्यावसायिकांकडे याबाबतचे परवाने दिले. त्यामध्ये पुण्यात सर्वाधिक ११० प्रकल्पांमध्ये ई-रजिस्ट्रेशनची सुविधा उपलब्ध करून दिली. पाठोपाठ मुंबई आणि नाशिकमधील २३ बांधकाम व्यावसायिकांना याबाबतची परवानगी दिली गेली. तसेच टप्प्याटप्प्याने राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही बिल्डर्सना ई-रजिस्ट्रेशनची परवानगी दिली गेली. सुरुवातीला परवानगी देताना ५० सदनिकांच्या प्रकल्पाची अट घातली गेली. त्यानंतर यामध्ये काहीशी शिथिलता आणत २० प्रकल्पांच्या सदनिका असलेल्या प्रकल्पस्थळी ई-रजिस्ट्रेशन प्रणाली उपलब्ध करून दिली.

मात्र, ग्राहकांनी या सुविधेकडे सपशेल पाठ फिरविल्याचे चित्र आहे. एक हजारांपेक्षा अधिक बिल्डर्सना ही सुविधा उपलब्ध करून दिली गेली असली तरी, याठिकाणी जेमतेमच दस्तनोंदणी झाल्याची स्थिती आहे. बहुतांश ग्राहक मुद्रांक नोंदणी कार्यालयात दस्त नोंदणीचा आग्रह धरत आहेत. मालमत्तेच्या व्यवहाराचे दस्त अचूक आणि योग्य व्हावेत या हेतूने ग्राहक मुद्रांक नोंदणी कार्यालयात दस्त नोंदणीचा आग्रह धरत आहेत. अशात बांधकाम व्यावसायिकांनादेखील होकार देण्याखेरीज पर्याय नसल्याने दुय्यम निबंधक कार्यालयात ग्राहकांची गर्दी वाढतच आहे. दरम्यान, राज्यात दस्त नोंदणीसाठी ‘ई-रजिस्ट्रेशन’ची सुविधा २०१४ पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

  • २३ बिल्डर्सकडे फक्त ११ दस्त नोंदणी

नाशिकमधील तब्बल २३ बांधकाम व्यावसायिकांकडे ई-रजिस्ट्रेशन प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांत केवळ ११ ग्राहकांनीच याठिकाणी दस्त नोंदणी केली आहे. ग्राहकांकडून प्रत्यक्ष दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीचा आग्रह धरला जात असल्याने, बांधकाम व्यावसायिकांचा नाइलाज होत असल्याचे सांगितले जात आहे. नाशिकप्रमाणेच इतर जिल्ह्यांतीलही दस्त नोंदणीची आकडेवारी जेमतेम असल्याचे सांगितले जात आहे.

दस्त कुठे नोंदवायचा याबाबतचा ग्राहकांना पर्याय असल्याने ग्राहक दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीला प्राधान्य देत आहेत. वास्तविक ही प्रणाली बांधकाम व्यावसायिकांकडे सुपूर्द करताना याबाबतची पुरेशी जनजागृती करणे आवश्यक होते. ग्राहकांचा या प्रणालीवर लगेचच विश्वास बसायला आणखी वेळ लागेल, असेच काहीसे दिसून येते.

– कैलास दवंगे, मुद्रांक जिल्हाधिकारी, नाशिक.

हेही वाचा :

Back to top button