दारूमुळे संसार उघड्यावर आले हो ! दारूविक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्याचे पोलिसांना आर्जव | पुढारी

दारूमुळे संसार उघड्यावर आले हो ! दारूविक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्याचे पोलिसांना आर्जव

वाळकी : पुढारी वृत्तसेवा :  नगर तालुक्यातील गुंडेगावमध्ये अवैद्य दारूविक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मध्यंतरी ग्रामस्थांनी अवैध दारूविक्रीच्या विरोधात तक्रारी केल्यानंतर पोलिसांनी दारूविक्रेत्यांवर कारवाई केली. परंतु कालांतराने पुन्हा जोमाने दारूविक्री वाढली. दारूमुळे आठ ते दहा जणांचा मृत्यूू झाला असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याची कैफियत मांडत, गुंडेगावातील दारूविक्रेत्यांच्या मुसक्या आवळा, असे साकडे ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनाला घातले आहे.

गावात दारू सहज उपलब्ध होत असल्याने शेकडो तरुण मुले व पुरुष दारूच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अनेकांकडून दारू पिऊन महिलांना मारहाण करण्याचे प्रकार वाढले आहेत. महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने आमच्या गावातील दारू त्वरित बंद करावी, अन्यथा आमच्या मरणाला जबाबदार तुम्ही राहा, असे आर्जव गुंडेगावातील महिलांनी केले आहे.

पोलिस प्रशासन अवैद्य दारू धंद्यांवर कोणतीच कारवाई करत नसल्याने त्यांच्या विरोधामध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अनेक वेळा दारूबंदी संदर्भात गावातील समाजसेवकांनी पुढाकार घेतला, दारूबंदीचा ठरावसुद्धा झाला, ग्रामपंचायतीच्या वतीने आयुक्तांकडे निवेदन दिले; पण अवैध दारू बंद झालीच नाही. दारूविक्रेत्यांना राजकीय वरदहस्त असल्याने दारूबंदी कागदावरच राहिली. मतदानाच्या काळातील दारूच्या प्रवाहात आपल्याच कार्यकर्त्यांचा संसार कधी वाहून गेला हे गावातील पुढारी मंडळींना समजलेच नाही, अशी व्यथाही महिलांनी मांडली.

ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने गुंडेगावातील अवैध दारू अड्डे उद्ध्वस्त करून विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी असे साकडे ग्रामस्थांनी घातले आहे. पोलिस प्रशासन अवैध दारूविक्री बंद करू शकत नसतील तर आता नव्या कायद्यात ग्रामरक्षक दलाच्या माध्यमातून दारूविक्री करणार्‍यासह पिणारा आणि दारूधंद्यास मदत करणार्‍या जागामालकावर कठोर कारवाईची तरतूद आहे. पुढील काळात अवैध दारू विक्री करणार्‍यावर गावपातळीवरच कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ठोस भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

गुंडेगाव येथील दारूबंदीसाठी गावातील महिलांनी एकत्र येऊन ऐतिहासिक लढा उभारला पाहिजे. बेकायदेशीर दारूविक्रीला राज्य उत्पादन शुल्क व पोलिसांनी वेळीच आळा घातला नाही तर आम्ही मोठ्या संख्येने तीव्र आंदोलन पोलिस मुख्यालयासमोर करू व गावातील अवैध दारूबंदीसाठी गाव पातळीवर प्रयत्न करू.
                                                           – संजय भापकर, सामाजिक कार्यकर्ते

हे ही वाचा :

https://pudhari.news/maharashtra/mumbai/564126/mumbai-news-murder-of-live-in-partner-in-mumbai/ar

https://pudhari.news/maharashtra/mumbai/564126/mumbai-news-murder-of-live-in-partner-in-mumbai/ar

https://pudhari.news/sports/564048/wtc-final-2023-indias-strategic-mistakes-benefit-to-australia/ar

Back to top button