नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील जेऊर येथे झालेल्या ग्रामसभेतील ठरावांची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन, तसेच ठराव देऊन पुढील कारवाईची मागणी करण्यात आली. ग्रामसभेत गावातील परवानाधारक देशी दारूचे दुकान बंद अथवा स्थलांतरित करणे, तसेच इतर ठराव संमत करण्यात आले होते. जिल्हाधिकार्यांकडे पुढील कारवाईसाठी ठराव पाठविल्याने ठरावाबाबत जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
ग्रामसभेमध्ये तरुणांनी आक्रमक भूमिका घेत गावातील परवानाधारक देशी दारूचे दुकान गावचे आराध्य दैवत देवी बायजामाता मंदिराच्या रस्त्यात येत असल्याने तसेच तेथील तळीरामांचा शाळेतील विद्यार्थिनींना त्रास सहन करावा लागत असल्याने दुकान बंद अथवा स्थलांतरित करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्याचप्रमाणे सीना नदीपात्रात सोडण्यात येणार्या गोठ्याच्या पाण्याची विल्हेवाट लावावी. बायजामाता मंदिराकडे जाणार्या रस्त्यालगत टाकण्यात आलेले उकिरडे हटवावेत, असे ठराव मंजूर करण्यात आले होते.
ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करण्यासाठीदेखील तरुणांनी आक्रमक भूमिका घेतली होती.
ठरावांवर काय कारवाई करण्यात आली, याबाबत पुन्हा ग्रामसभा घेण्याची मागणी केली होती. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाकडून ठरावांच्या अंमलबजावणीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. गावातील गोठेधारकांमुळे आरोग्याचा, तसेच पाणी दूषित होत असल्याने दूषित पाणी व शेणखताची विल्हेवाट लावण्याचा ठराव घेण्यात आला होता. त्यामुळे ग्रामपंचायतीने संबंधित गोठेधारक मालकांना नोटिसा बजावल्या आहेत. तसेच परवानाधारक देशी दारूचे दुकान बंद अथवा स्थलांतरित करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी, तहसीलदार, राज्य उत्पादन शुल्क यांना ठराव देण्यात आले आहेत. परवानाधारक दुकान बंद अथवा स्थलांतरित करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पार पाडूनच तो ठराव अमंलात येऊ शकतो. त्यामुळे याबाबत जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.
प्रशासनाकडून सहकार्याची अपेक्षा
ग्रामसभेत मंजूर झालेले ठराव अमंलात येण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाला संबंधित वरिष्ठ अधिकार्यांनी सहकार्य करण्याची गरज आहे. ग्रामसभेतील सर्व ठराव अमलात आणण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करण्याची अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त करण्यात येत आहे.
हे ही वाचा :