पुणे जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या घटली | पुढारी

पुणे जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या घटली

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यामध्ये कुपोषित बालकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. सप्टेंबर 2022 च्या तुलनेत जूनच्या अहवालानुसार कुपोषित बालकांचा टक्का कमी झाल्याची दिलासादायक बाब महिला व बालकल्याण विभागाच्या आकडेवारीवरून समोर आली आहे. सध्या आढळलेल्या साडेतीनशे बालकांना सुदृढ करण्यासाठी ग्राम बालविकास केंद्रात दाखल केले जाणार आहे. जिल्ह्यामध्ये सध्या 44 तीव्र कुपोषित (सॅम) बालके, तर 302 मध्यम कुपोषित (मॅम) बालकांची संख्या आढळली.

ही संख्या गेल्यावेळी सॅम 131 आणि मॅम 715 एवढी मोठी होती. त्यामध्ये 544 ने घट झाल्याची दिलासादायक बाब आहे. यापूर्वी आढळलेल्या 846 बालकांना ग्राम बालविकास केंद्रात दाखल करून त्यांना आहार आणि औषधोपचार करण्यात आला होता. त्याचा त्यांना फायदा झाला होता. त्यामुळे येत्या 15 जूनपासून पुन्हा 346 बालकांना ग्राम बालविकास केंद्रात दाखल करण्यात येणार आहे. या बालकांसाठी 288 ग्राम बालविकास केंद्रे विविध अंगणवाड्यांमध्ये सुरू करण्यात येणार आहेत.

जिल्हा कुपोषणमुक्त करण्याचा हा निर्धार घेऊन जिल्हा परिषदेने ग्राम बालविकास केंद्रे सुरू केली आहेत. या केंद्रांत 346 कुपोषित बालकांसाठी विशेष नियोजन केले आहे. कुपोषित बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. शून्य ते सहा वयोगटातील मुलांमधील हे कुपोषण टाळण्यासाठी मुलांना चौरस आहार देण्यात येणार आहे. या मुलांच्या पोषणासाठी अंगणवाडीसेविकांना आगाऊ स्वरूपात जिल्हा परिषदेकडून निधी देण्यात येणार आहे.

काय केले जाणार?

कुपोषित बालकांना दैनंदिन आहार, औषधे आणि त्यांचे दररोज मॉनिटरिंग केले जाणार आहे. याशिवाय शनिवारी व रविवारी सुटीच्या दिवशी तालुक्यातील अधिकार्‍यांना दुसर्‍या तालुक्यात जाऊन प्रत्यक्षात पाहणीची जबाबदारी देण्यात येणार आहे. या केंद्रामध्ये बालकांना 8 वेळा पौष्टिक आहार व आवश्यक औषधे देण्यात आली आहेत. तालुका आरोग्य अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार केले जाणार आहेत.

अशा प्रकारचा आहार दिला जाणार

ग्राम बालविकास केंद्रामध्ये देण्यात येणार्‍या आहारामध्ये नाचणी खीर, गहुसत्त्व खीर, कोथिंबीर मुठीया, मेथी मुठीया, मसाला इडली, थालीपीठ, केळी, मुरमुरा लाडू इत्यादी पदार्थांचा समावेश असणार आहे.

कुपोषण संख्येत घट झाली आहे. बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी गेल्या वेळी राबविलेल्या ग्राम बालविकास केंद्रांचा चांगला फायदा होत आहे. त्यामुळे 15 जूनपासून पुन्हा 288 ग्राम बालविकास केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.

– जामसिंग गिरासे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग, जि. प.

हेही वाचा

पुणे : खुनाच्या प्रयत्नातील तिघांना बेड्या; दोन पिस्तुले, काडतुसे, कोयता जप्त

Kolhapur News | कोल्हापुरात तणावपूर्ण शांतता, परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर

डॉ. प्रदीप कुरुलकरची हेरगिरी : एटीएस अडकली मोबाईल लॉकमध्ये !

Back to top button