अमृतसरच्या प्रवाशाची भुसावळात गळा चिरून हत्या, रेल्वे यार्डात सापडला मृतदेह | पुढारी

अमृतसरच्या प्रवाशाची भुसावळात गळा चिरून हत्या, रेल्वे यार्डात सापडला मृतदेह

जळगाव : नांदेड-अमृतसर एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा मृतदेह भुसावळ शहरातील रेल्वे यार्डात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रवासी अमृतसर येथील रहिवासी असून, त्याचा गळा चिरून खून करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी मयताच्या चार मित्रांविरोधात भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनमीतसिंग गुरूप्रीत सिंग (वय १९, रा.अमृतसर, पंजाब) असे मयत युवकाचे नाव आहे. मनमीतसिंग आपल्या पाच मित्रांसह बुधवार, २६ रोजी नांदेड-अमृतसर एक्स्प्रेसने अमृतसरकडे निघाला होता. मात्र त्यांचा एका प्रवाशाशी वाद झाल्यानंतर त्यांनी संबंधितास मारहाण केली. मात्र संबंधिताने सुरक्षा यंत्रणांशी संपर्क साधल्यानंतर पाचही तरुण खंडवा मार्गावरील रेल्वे यार्डात उतरले होते. गुरुवारी सकाळच्या सुमारास मनमीतसिंगचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे सोबतच्या चारही मित्रांनीच हा खून केल्याचा संशय आहे. याबाबत मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार चारही संशयीतांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शवविच्छेदनात खुनाचा उलगडा…

खंडवा मार्गावरील यार्डात कॉर्ड लाईनवर मनमीतसिंग गुरूप्रीतसिंग या प्रवाशाचा मृतदेह सापडला आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेला असता, त्यास मारहाण करुन खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी सुरूवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र नंतर मयताच्या भावाने फिर्याद दिल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शखाली पोलिस तपास करीत आहे.

हेही वाचा :

Back to top button