चीन मध्ये नवदाम्पत्यांना विचारले जातेय मूल कधी होणार? काय आहे कारण? वाचा.. | पुढारी

चीन मध्ये नवदाम्पत्यांना विचारले जातेय मूल कधी होणार? काय आहे कारण? वाचा..

बीजिंग : सर्वाधिक लोकसंख्या असलेला चीन सध्या घटत्या जन्मदराच्या दराने चिंतीत आहे. हाच जन्मदर वाढविण्यासाठी या देशात प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून सरकारकडून नवदाम्पत्यांना कधी मूल होईल, अशी विचारणा होत आहे.

एक नवविवाहित महिलेने सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मला क्षेत्रीय प्रशासनाकडून एक फोन आला, त्यामध्ये मूल केव्हा होईल? अशी विचारणा करण्यात आली. यानंतर त्याच्या या पोस्टवर सुमारे 10 हजारांहून अधिक लोकांनी कमेंट केली. यामध्ये त्यांनी आपल्यालाही असा कॉल आल्याचे म्हटले आहे. मात्र, त्यानंतर प्रशासनाच्या वतीने ही पोस्ट हटविण्यात आली.

अन्य एका महिलेने सांगितले की, मला असाच कॉल आला होता. यामध्ये बोलणार्‍या अधिकार्‍याने मला कधी मूल होणार अशी विचारणा केली. पुढे त्या अधिकार्‍याने सांगितले की, नवविवाहित तरुणींनी लवकरात लवकर बाळाला जन्मास घालावे, अशी सरकारची अपेक्षा आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी गेल्या आठवड्यात झालेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीत देशाच्या जनसंख्या विकास धोरणात सुधारणा करण्यावर भर दिला होता. वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्टस् 2019 अनुसार चीनची लोकसंख्या 1.44 अब्ज असून हा देश याबाबतीत पहिल्या स्थानावर आहे. तर दुसर्‍या स्थानावरील भारताची लोकसंख्या 1.39 अब्ज इतकी आहे. चीनचा जन्मदर कमालीचा घटला असून तो वाढवण्याचा प्रयत्न होत आहे.

Back to top button