धाकट्याने केला थोरल्या भावाचा खून; पैशाच्या कारणावरुन माळेगावात घडला प्रकार | पुढारी

धाकट्याने केला थोरल्या भावाचा खून; पैशाच्या कारणावरुन माळेगावात घडला प्रकार

बारामती; पुढारी वृत्तसेवा: चप्पल व्यवसायासाठी दिलेल्या पैशाबाबत धाकट्या भावाने जाब विचारल्याने थोरल्या भावाने त्याला हाताने लाथाबुक्यानी मारहाण केली. यामुळे चिडलेल्या धाकट्या भावाने थोरल्यावर चाकूने वार करत त्याचा खून केल्याची घटना बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रूक येथे घडली. कल्पेश अरुण धुळप (वय २६, रा . अमरसिन्ह कॉलनी, माळेगाव बुद्रूक) असे खून झालेल्याचे नाव आहे. त्याचा धाकटा भाऊ मंथन अरुण धुळप (वय २३) यास अटक केली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली.

२८ ऑक्टोबरला रात्री साडे नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत सुरेखा अरुण धुळप यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीच्या घरात ही घटना घडली. कल्पेश व मंथन ही फिर्यादीची मुले आहेत. शुक्रवारी मंथन याने मोठा भाऊ कल्पेश याला चप्पल व्यवसायासाठी आठ दिवसांपूर्वी दिलेल्या १ लाख ४० हजार रुपयांबद्दल विचारणा केली. त्यावर कल्पेश याने हे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवल्याने आता माझ्या खात्यावर पैसे नाहीत.

मी नंतर पैसे देतो असे सांगितले. त्यामुळे मंथन हा त्याच्यावर रागावला. या कारणावरुन कल्पेश याने त्याला हाताने. बुक्यानी मारहाण केली. ते सहन न झाल्याने मंथन याने घरातील कपाटातील चाकू काढून कल्पेश याच्या मानेवर, छातीवर वार करत त्याचा खून केला. पोलिसांनी तात्काळ मंथन यास अटक केली आहे. वैद्यकीय तपासणीनंतर बारामती उपकारागृहात त्याला ठेवण्यात आले.

 

 

Back to top button