नाशिक : हाती ‘मशाल’ घेत शिवसैनिकांचा फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष | पुढारी

नाशिक : हाती 'मशाल' घेत शिवसैनिकांचा फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा

निवडणूक आयोगाने ठाकरे गटाच्या शिवसेनेला मशाल हे चिन्ह दिल्यानंतर मनमाड शहरातील शिवसैनिक हातात मशाल घेऊन मंगळवारी (दि.11) रस्त्यावर उतरले. एकात्मता चौकात फटाक्यांची अातषबाजी करत त्यांनी जल्लोष व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी “शिवसेनेची निशाणी मशाल, आमची निशाणी मशाल” अशा घोषणा देत निशाणीला घराघरांत पोहोचविण्याचे उद्दिष्ट असल्याचे शहरप्रमुख माधव शेलार यांनी पत्रकाराशी संवाद साधताना सांगितले.

चिन्ह गोठविल्यानंतर काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सोमवारी (दि.10) निवडणूक आयोगाने याबाबत निर्णय घेऊन ठाकरे गटाच्या राजकीय पक्षाला तूर्त शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे तर शिंदे गटाच्या पक्षाला बाळासाहेबांची शिवसेना असे नाव दिले. ठाकरे गटाने त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल ही तीन चिन्हांची नावे दिली होती. त्यापैकी निवडणूक आयोगाने मशाल चिन्ह मंजूर करून ते दिले आहे. मशाल हे चिन्ह मिळाल्यानंतर शहरातील ठाकरे गटाचे शिवसैनिक हातात मशाल घेऊन रस्त्यावर उतरले. शहरप्रमुख माधव शेलार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या जल्लोषात माजी नगराध्यक्ष दिलीप सोळसे, प्रवीण नाईक यांच्यासोबत संजय कटारिया, कैलास गवळी, लियाकत शेख, प्रमोद पाचोरकर, शैलेश सोनवणे, अनिल दराडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button