आंबेगाव भागात खेकड्यांना मागणी वाढली, खवय्यांची चंगळ | पुढारी

आंबेगाव भागात खेकड्यांना मागणी वाढली, खवय्यांची चंगळ

पारगाव, पुढारी वृत्तसेवा: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात सध्या खेकड्यांना मागणी वाढली आहे. येथील घोड, मीना नद्यांच्या किनारी तसेच ओढ्याच्या किनारी खेकडे मोठ्या प्रमाणात मिळत आहेत. शेजारील जुन्नर, शिरूर तालुक्यातील मच्छीमार या परिसरात येऊन खेकडे पकडताना दिसत आहेत.

तालुक्याच्या पूर्व भागात घोड, मीना नद्यांचे पात्र आहे. यंदा या परिसरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. डिंभे धरण (हुतात्मा बाबू गेनू जलसागर) व वडज धरणातून तीन ते चार वेळा घोड व मीना नद्यांच्या पात्रात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे पाण्याबरोबरच खेकडे मोठ्या प्रमाणात वाहून आले आहेत. त्यामुळे खेकडे पकडण्यासाठी मच्छिमार मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. मीना नदी पात्रालगत ओढ्याच्या किनारी मोठ्या प्रमाणात खेकडे मिळत आहेत. त्यामुळे मच्छीमार भल्या सकाळीच ओढ्याच्या किनारी लंबगोलाकार पाट्या पाण्यात लावून जातात. नंतर त्या पाट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खेकडे मिळतात.

आता गणेशोत्सव, नवरात्रोत्सव संपले आहेत. त्यामुळे मासे, खेकडे खाण्यासाठी खवय्यांची चंगळ झाली आहे. सध्या मोठ्या शहरांमध्ये खेकड्यांना किलोला 400 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे, परंतु या परिसरात हा दर अवघा 200 रुपये किलो असा आहे, त्यामुळे खेकड्यांना मोठी मागणी आहे.

Back to top button