नगर, पुढारी वृत्तसेवा: भिंगारमधील बनावट एनओसी प्रकरणात महत्त्वाचा पुरावा ठरणार्या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या लॅपटॉपसह इतर साहित्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना सेामवारी (दि.10) न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने यातील आरोपी रोहन किशोर धेंडवाल (रा. वैद्य कॉलनी, नगर-जामखेड रोड) याच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे. तर, प्रमुख आरोपी राजेंद्र उर्फ राजा ठाकूर (वय 42, रा. वैद्य कॉलनी) याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.
राजेंद्र उर्फ राजा ठाकूर हा बनावट एनओसी प्रकरणात प्रमुख आरोपी असल्याचे तपासात पुढे आल्यानंतर कोतवाली पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला न्यायालयात (दि.5) हजर केले असता, तीन दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली होती. दरम्यान, त्यानंतर राजा ठाकूरचा साथीदार रोहन धेंडवाल याला पोलिसांनी अटक केली. रोहन धेंडवाल याला पहिले तीन दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली होती. दरम्यान, दोघांच्याही पोलिस कोठडीची मुदत सोमवारी संपत असल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर केले होते. पुढील तपासासाठी पोलिसांकडून दोन्ही आरोपींच्या कोठडीची मागणी न्यायालयात करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने आरोपी राजा ठाकूर याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली असून, रोहन धेंडवाल याच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे.
कोतवाली पोलिसांच्या पथकाने आरोपी रोहन धेंडवाल याच्याकडून बनावट एनओसी तयार करण्यासाठी आर्मी हेडक्वार्टरच्या नावाने वापरलेले दोन शिक्के, ऑफिस पास व प्रिंटर जप्त केले आहे. तसेच, त्याच्याकडील लॅपटॉपचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. लॅपटॉपमध्ये आरोपींशी संबंधित असलेल्यांची नावे समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
बनावट एनओसी प्रकरणात अटक केलेल्या दोन्ही आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली होती. न्यायालयाने आरोपी रोहन धेंडवाल याच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे.
– अनिल कातकडे, पोलिस उपअधीक्षक