भिगवण : 13 लाखांचे वसूल केले 21 लाख रुपये, ठेवला शेतकर्‍याच्या शेतीवर डोळा; पाच सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल | पुढारी

भिगवण : 13 लाखांचे वसूल केले 21 लाख रुपये, ठेवला शेतकर्‍याच्या शेतीवर डोळा; पाच सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल

भिगवण, पुढारी वृत्तसेवा: आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेटफळगढेच्या शेतकर्‍याला खासगी सावकारांनी 13 लाख रुपये व्याजाने दिले. भाबड्या शेतकर्‍याने 13 लाखांचे व्याजासह 21 लाख परत केले; मात्र तरीही सावकारांचे भागेना म्हणून शेतीवरही डोळा ठेवला. मग मात्र पोलिसांनी मुजोर सावकारांना इंगा दाखवला आणि शेटफळगढेसह बारामतीच्या पाच सावकारांविरुद्ध भिगवण पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली विलास शिरसट (वय 35), गणेश वसंत राजपुरे (वय 24), रवींद्र बाळासाहेब शिरसट (वय 35), वसंत ज्ञानदेव राजपुरे (वय 50, सर्व रा. शेटफळगढे, ता. इंदापूर) व प्रताप शिवाजीराव तावरे (रा. माळेगाव, ता. बारामती) या पाच सावकारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्याद प्रवीण दिलीप मुळीक (रा. शेटफळगढे) यांनी दिली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण मुळीक यांच्या आर्थिक अडचणीचा गैरफायदा घेत वरील खासगी सावकारांनी 13 लाख रुपये साडेतीन टक्के व्याजदराने दिले होते. दिलेल्या पैशाच्या सुरक्षेसाठी या सावकारांनी मुळीक यांची वडिलोपार्जित शेतजमीन गट नंबर 41 मधील 55 आर क्षेत्र खरेदीखत करून घेतले होते व व्याजासह मुद्दल परत करताच जमीन परत करण्याचे ठरले होते. ही घटना 2016 ते 2022 या दरम्यानची आहे.

दरम्यान मुळीक यांनी 13 लाख मुद्दल व व्याजासह 21 लाख संबंधित सावकारांना परत केले व जमीन परत मागितली. मात्र, सावकारांनी मुळीक व त्यांच्या वडिलांना मारहाण, शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. अखेर धाडस करून मुळीक यांनी भिगवण पोलिसांत धाव घेत या पाच सावकारांविरोधात तक्रार दिली. यावरून पोलिसांनी वरील पाच जणांविरुद्ध महाराष्ट्र सावकारकी अधिनियम कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जाधव करीत आहेत.

 

Back to top button