आरटीओ प्रशासन : नियम धाब्यावर बसवत अवैध वाहतूक सर्रास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील नांदूर नाक्यावर ट्रक-खासगी बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात १२ निष्पाप प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातामागची कारणे शोधली असता अनेक धक्कादायक बाबी समोर येत असून, क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणे हीदेखील गंभीर बाब यानिमित्त समोर येत आहे. वास्तविक वाहतूक, परिवहन विभागाच्या आशीर्वादानेच अवैध वाहतुकीला बळ मिळत असून, नियम धाब्यावर बसवून सर्रासपणे ही वाहतूक केली जात आहे.
नाशिक शहराअंतर्गत आणि बाहेरून येणाऱ्या वाहनांमधून सर्रासपणे अवैध वाहतूक केली जाते. ट्रॅव्हल्स, रिक्षा, टेम्पो, ट्रक यामधून ही वाहतूक केली जात असून, वाहतूक शाखेचा कानाडोळा आणि आरटीओ कार्यालयाचा आंधळा कारभार यास कारणीभूत असल्याचा आरोप नाशिककरांकडून केला जात आहे. एखादा अपघात घडल्यानंतर प्रशासन कारवाईचा केवळ फार्स करते. वाहनांच्या तपासण्या केल्याचा बनावही केला जातो. हा प्रकार काही दिवस सुरू असतो. त्यानंतर मात्र परिस्थिती जैसे थे बघावयास मिळते. वास्तविक, सद्यस्थितीत शहरात एक हजारांपेक्षा अधिक अनधिकृत रिक्षा रस्त्यावर धावतात. या रिक्षांकडे कुठल्याही प्रकारचे परमिट नाही, शिवाय या रिक्षाचालकांकडून नियम पाळले जात नाही. सर्रासपणे या रिक्षा रस्त्यावर धावतात. मात्र, वाहतूक विभाग डोळे बंद करून अवैध वाहतुकीला एकप्रकारे मूकसंमती देत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. त्याचबरोबर चारचाकी प्रवासी वाहतुकीबाबतही काहीशी अशीच स्थिती आहे. बाहेरून शहरात दाखल होणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवाले तर कोणत्याही प्रकारचे नियम पाळत नाही, अशातही त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याची बाब यापूर्वीदेखील समोर आली आहे.
शहर वाहतूक शाखेचे पोलिस गर्दीच्या चौकात अपवादानेच कर्तव्यावर दिसून येतात. अन्यथा, त्यांना स्कॉडची ड्यूटीच प्रिय असते. आरटीओ कार्यालयाचा कारभारच एजंटांच्या मध्यस्थीने चालत असल्याने वाहन चालविण्याचा परवाना काढणार्यांचा आणि वाहतुकीच्या नियमांचा तसा संबंध क्वचितच येतो. या सर्व प्रकाराचा फटका सामान्य अन् नियमात राहून वाहतूक करणाऱ्या बसत आहे. शिवाय अवैध वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातात निष्पाप प्रवाशांना जीव गमवावा लागत असून, नांदूर नाक्यावर झालेला अपघाताला अवैध वाहतूक हेदेखील कारण असल्याचा आरोप आता केला जात आहे.
खासगी ट्रॅव्हल्स प्रवासी वाहतुकीसाठी केवळ नावालाच असून, गुडस् ट्रान्स्पोर्टिंगसाठी या ट्रॅव्हल्सचा सर्रासपणे वापर केला जात आहे. जीएसटी वाचविण्यासाठी किंवा इतर कारणांमुळे या गाड्यांच्या डिकींमध्ये अवैधरीत्या वेगवेगळ्या साहित्यांची वाहतूक केली जाते. बऱ्याचदा तर ज्वलनशील पदार्थांची वाहतूक केली जाते. गाड्यांच्या डिकींमध्ये प्रचंड अवजड माल भरला जातो. शिवाय प्रवाशांनाही बसविले जात असल्याने, ओव्हरलोड गाड्या रस्त्यावर चालविल्या जातात. त्यामुळे गाडी कंट्रोल करणे अवघड होते. या सर्व प्रकाराकडे वाहतूक विभागही डोळेझाक करते. नांदूर नाक्यावर घडलेला अपघात याच कारणामुळे घडला असावा, ज्याचा शोध घेणे गरजेचे आहे. – सचिन जाधव, राज्य अध्यक्ष, मोटार मालक, कामगार वाहतूक संघटना