बारामती : सभासदांचे नुकसान होऊ देणार नाही : अजित पवार | पुढारी

बारामती : सभासदांचे नुकसान होऊ देणार नाही : अजित पवार

बारामती; पुढारी वृत्तसेवा: ‘सोमेश्वर’च्या कार्यक्षेत्रातील दहा गावे माळेगावला जोडण्याचा निर्णय झाला आहे. यासंबंधी सभासदांचे कोणतेही नुकसान होऊ देणार नाही, अशी ग्वाही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. सोमेश्वरनगर येथे बोलताना पवार म्हणाले, सभासदांचे नुकसान होईल, असा निर्णय कदापि घेतला जाणार नाही. पुणे, सातारा जिल्ह्यातील बहुतांश सर्वच कारखान्यांनी आता विस्तारवाढ केली आहे. त्यामुळे उसाचे वेळेत गाळप होण्यास फारशी अडचण येणार नाही.

सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रात यंदा 15 ते 16 लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. 15 ऑक्टोबरपासून गळीत हंगाम सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. सोमेश्वरचे विस्तारीकरण झाले असल्याने पाच हजार टन प्रतिदिन होणारे गाळप आता साडेआठ हजार टनाने होईल. हंगाम सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या पंधरा दिवसात गाळपाचा अंदाज येईल.

कार्यक्षेत्रात यंदाही उसाचे क्षेत्र मोठे आहे. अतिरिक्त ऊस असला तरी विस्तारीकरणामुळे वेळेत गाळप होईल. 30 एप्रिलपर्यंत सर्व उसाचे गाळाप केले जाईल. माळेगावच्या तुलनेत सोमेश्वरला उशिरा शैक्षणिक संकुल उभे राहिले. आता 108 विद्यार्थिनींसाठी वसतिगृह उभे केले जात आहे. शिक्षण संस्थेमुळे सभासदांची मुले उच्चशिक्षित होणार आहेत.

सोमेश्वरवासीयांची क्रीडा संकुलाची मागणी आहे. त्यासंबंधी लवकरच निर्णय घेतला जाईल. सोमेश्वरने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभा केल्याने नदीचे पाणी दूषित होणार नाही. शेती पिकांना देण्यायोग्य पाणी नदीत राहणार असून प्रदुषित पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल, असे त्यांनी सांगितले.

 

Back to top button