नगर : तीन महिन्यांत ओढे-नाले खुले करा, जिल्हाधिकार्‍यांच्या मनपाला सूचना | पुढारी

नगर : तीन महिन्यांत ओढे-नाले खुले करा, जिल्हाधिकार्‍यांच्या मनपाला सूचना

नगर : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील 21 नैसर्गिक ओढ्या-नाल्यांवर 41 ठिकाणी सिमेंटचे पाईप टाकून नैसर्गिक प्रवाह अडविला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी अडवून पूर परिस्थिती निर्माण होत असल्याचे सर्वेक्षणात समोर आले. त्यावर आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तीन महिन्यांत ओढ्या-नाल्यांवरील पाईप टाकून टाका, अशा सूचना करीत ओढ्या नाल्यांमध्ये इमारती बांधण्यास कोणी परवानगी दिली, असा जाब अधिकार्‍यांना विचारला आहे. शहरात लहान-मोठे 21 ओढे होते. आता प्रत्यक्षात त्या ओढ्याच्या नाल्या झाल्या आहेत.

उपनगरामध्ये शहर वाढत चालल्याने अनेकांनी नैसर्गिक ओढे बुजवून अनधिकृत बांधकामे केली. तर, काही ठिकाणी ओढ्यावर पाईप टाकून बुजविण्यात आला. नैसर्गिक ओढ्याची रूंदी कमी केली. सुमारे छोटे-मोठ्या 21 ओढ्या-नाल्यांवर 41 ठिकाणी नैसर्गिक प्रवाह अडविण्यात आले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी घुसले, असे सर्र्वेेक्षणात स्पष्ट झाले आहे. सावेडी उपनगरातील निर्मलनगर, गावडे मळा, नालेगाव, सर्जेपुरा, रामवाडी आदी भागांमध्ये ओढ्या-नाल्याचे पाणी घराध्ये शिरले होते. याबाबत काही थेट मुख्यमंत्री, मुख्य सचिव, जिल्हाधिकारी व आयुक्तांकडे तक्रारी केल्या.

त्यावर मुख्यमंत्री कार्यायलाकडून तत्काळ कारवाई करा, अशा सूचना आल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकार्‍यांनी मनपा अधिकार्‍यांची बैठक बोलविली होती. त्या बैठकीला ज्येष्ठ नागरिक कृती मंचाचे पदाधिकारी उपस्थित होते. शहरातील नैसर्गिक ओढ्या-नाल्यांवर पाईप टाकून प्रवाह अडविला आहे. तर, ओढ्या-नाल्यांवर अतिक्रमण करणे, प्रवाह बदलणे, रूंदी कमी करणे, ओढा बंदिस्त करण्यात आला. हे नैसर्गिक प्रवाह खुले करण्यासंदर्भात अर्ज करूनही मनपाने काय कारवाई केली, अशी विचारणा जिल्हाधिकार्‍यांनी केली.

दरम्यान, तीन महिन्यात अतिक्रमणाच्या कायद्यानुसार ओढ्या-नाल्यांवरील पाईप काढून खुले करावे, अशा सूचनाही दिल्या आहेत. मनपा अधिकार्‍यांनी स्थळपाहणी करून अहवाल सादर करण्याबाबतही सूचना करण्यात आल्या आहेत.

आठ किलोमीटरचे ओढे-नाले भूमिगत
मनपाने शहरातील नैसर्गिक ओढ्या नाल्याचे सर्वेक्षण केले असून, त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना अहवाल दिला आहे. त्यात शहरात 21 ओढे-नाले असून, त्याची लांबी 83.63 किलोमीटर आहे. ओढे-नाले 41 ठिकाणी पाईप टाकून भूमिगत करण्यात आले असून, त्यांची लांबी 8.23 किलोमीटर आहे. त्यात सावेडी भागात सर्वात जास्त ओढे-नाले बंदिस्त केल्याचे आढळून आल्याचे मनपाने अहवालात नोंदविले आहे.

Back to top button