एखाद्याच्या हातातील पक्ष हिसकावणे कितपत योग्य? माजी मंत्री जयंत पाटील | पुढारी

एखाद्याच्या हातातील पक्ष हिसकावणे कितपत योग्य? माजी मंत्री जयंत पाटील

खरवंडी कासार : पुढारी वृत्तसेवा :  पक्षफुटीनंतर पक्षाचे चिन्ह गोठविणे इथपर्यंत समजू शकतो. पण, एखाद्याच्या हातातील पक्षच हिसकावणे कितपत योग्य आहे, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला. जयंत पाटील व आमदार धनजंय मुंढे यांनी रविवारी भगवान गडाला भेट दिली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. पाटील म्हणाले, पक्षफुटीनंतर अशा घटनांमध्ये निकाल देताना निवडणूक आयोगाने पक्ष वापरायला बंदी घालण्याचा प्रकार यापूर्वी कधीच झाला नाही. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेण्याआधी एखाद्याच्या हातातील पक्ष हिसकावून घेणे कितपत योग्य आहे. त्यामुळे निर्णय कसा झाला, याबाबत लोकांमध्ये आश्चर्य आहे. भाजपाने शिवसेना संपविण्याची पावले उघड-उघड कशी टाकली, हे गेल्या तीन-चार महिन्यांत दिसून आले.

शिवसेना संपविण्यात पवारांचा हात असल्याचा आरोप होत आहे, या प्रश्नाबाबत ते म्हणाले की, पवार व बाळासाहेबांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. पूर्वीच्या अनेक दसरा मेळाव्यांना पवार गेले आहेत. त्यामुळे पवार शिवसेना सपंवतील, हे शक्य नाही. आता भाजपाच्या अंगलट यायला लागले म्हणून भाजपचे बगलबच्चे, अशी विधाने करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मी यापूर्वी भगवानगडावर आलो नाही. पण, अर्थमंत्री असताना आमदार घुले यांच्या सूचनेनुसार भगवानगडाचा तीर्थक्षेत्रामध्ये समावेश करून तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी प्राप्त करून दिला आहे.

माजी मंत्री धनजंय मुंडे म्हणाले की, निकालात न्याय, अन्याय कोणाच्या बाजूने हा भाग वेगळा. पण एखाद्या पक्षावर पूर्णपणे बंदी आणणे, पक्षाचे नाव कोणीही न वापरणे, हे देशाच्या इतिहासात घडले नाही. ही अभूतपूर्व घटना आहे. हे कसे घडले, त्याचे उत्तर कोणीही देईल. हे कोणामुळे घडले, ते सांगायची गरज नाही. उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी या निकालासंदर्भात आश्चर्य व्यक्त केले नाही, या बाबत बोलताना मुंडे म्हणाले की, त्यांना आश्चर्य कसे वाटेल? त्यांना हे माहित होते. म्हणून त्यांना आश्चर्य वाटले नाही. ज्याला माहित नसते, त्यांना आश्चर्च वाटते.

तिघा दिग्गजांची बंद खोलीत चर्चा
भगवानगडावरील विकास कामे व नियोजित मंदिर बांधकामाची माहिती महंत डॉ. नामदेव शास्त्री देत होते. त्यावेळी जयंत पाटील यांचे लक्ष एका बंद बांधकामाकडे गेले. त्याबाबत महंतांना त्यांनी विचारले असता, महंत म्हणाले की सात वर्षांच्या वादाचे हे फलित आहे. याबाबत तुम्हाला आतमध्ये सांगतो. त्यानंतर महंत शास्त्री, जयंत पाटील, धनंजय मुंडे यांची बंद खोलीत चर्चा झाली. चर्चेचा तपशील मात्र समजू शकला नाही.

Back to top button