नाशिक : हाती तिरंगा घेत भाविकांची ब्रह्मगिरी फेरी | पुढारी

नाशिक : हाती तिरंगा घेत भाविकांची ब्रह्मगिरी फेरी

त्र्यंबकेश्वर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन आणि श्रावणाचा तिसरा सोमवार एकाच दिवशी आले. त्यामुळे भाविकांनी रविवारी सायंकाळपासूनच ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला सुरुवात केली. रात्री 12 नंतर भाविकांचा ओघ वाढला होता. सोमवारी दिवसभर भाविक प्रदक्षिणेला जाताना दिसत होते. रात्री उशिरापर्यंत प्रदक्षिणेवरून परतणार्‍या भाविकांची संख्या लक्षणीय होती. शनिवार, रविवार आणि सोमवार सलग तीन दिवस ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्ग भाविकांनी गजबजला होता. तिरंगा हातात घेऊन फेरी मारणारेदेखील लक्षणीय संख्येने होते.

खंबाळा येथे खासगी वाहने थांबविण्यात आली. भाविक एसटी बसने त्र्यंबकेश्वर येथे येत असताना पेगलवाडी फाटा प्रयागतीर्थ या ठिकाणी उतरून तसेच प्रदक्षिणेला रवाना होत आणि परत येताना गणपत बारी येथून जव्हार रस्त्याने थेट नवीन बसस्थानकावर जाऊन तेथून माघारी गावी परत फिरले. कुशावर्तावरदेखील रविवारी रात्री 8 पासूनच गर्दी झाली होती. त्र्यंबकराजची पालखी स्नानासाठी येईपर्यंत भाविकांचा ओघ कायम होता.

हीआयपींची गर्दी
शनिवार ते मंगळवार हा व्हीआयपींच्या नातेवाइकांच्या देवदर्शनाचा वार होता. मंत्रिमहोदयांनी नुकतीच शपथ घेतल्याने आणि स्वातंत्र्य दिन असल्याने ते आले नाही. मात्र, त्यांचे नातेवाईक सचिव यांनी पर्वणी साधली. यामध्ये वनमंत्री मुनगंटीवार यांचे पीए, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे ओएसडी, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या भगिनीसह दूरदर्शन मालिकांमधील कलाकार, राज्यातील व बाहेरच्या राज्यातील माजी आमदार व माजी खासदार तसेच त्यांचे नातेवाईक, महसूल व पोलिस अधिकारी, कोर्ट असा व्हीआयपींचा लवाजमा येत होता आणि कोठी दरवाजाने दर्शनासाठी जात होता.

हेही वाचा :

Back to top button