नाशिक : जिल्ह्यातील विकासकामांना मागील सरकारकडून खीळ - ना. भुजबळांचा निशाणा | पुढारी

नाशिक : जिल्ह्यातील विकासकामांना मागील सरकारकडून खीळ - ना. भुजबळांचा निशाणा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या सात वर्षांपासून जिल्ह्यातील पुणे विद्यापीठ उपकेंद्र, कृषी टर्मिनल, आदिवासी क्रीडा प्रबोधिनी अशी विविध विकासकामे रखडली आहेत. गेल्या सरकारने या कामांकडे लक्ष दिले नाही, अशा शब्दांत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी तत्कालीन भाजप सरकारवर निशाणा साधला. उपकेंद्राचे लवकरच भूमिपूजनासह रखडलेली अन्य विकासकामे तातडीने मार्गी लावली जातील, अशी माहिती त्यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (दि.26) पालकमंत्र्यांनी विविध विकासकामांचा आढावा घेतला. त्यानंतर ना. भुजबळांनी पत्रकारांशी संवाद साधला. 2014 पूर्वी जिल्ह्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. पण, त्यानंतर राज्यात सत्तांतरानंतर तत्कालीन सरकारने कामांकडे दुर्लक्ष केल्याने या कामांना खीळ बसल्याचा आरोप भुजबळांनी केला. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याने ही कामे मार्गी लावण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. शिवनई (ता. दिंडोरी) येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रस्तावित उपकेंद्रापर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.

इगतपुरीतील भावली येथील आदिवासी क्रीडा प्रबोधिनीचे 2014 साली भूमिपूजन करताना 54 कोटींचा निधी मंजूर होता. पण गेल्या सात वर्षांत प्रबोधिनीचे कामकाज पुढे न सरकल्याने निधी परत गेल्याबद्दल भुजबळांनी नाराजी व्यक्त केली. या काळात प्रबोधिनी अन्यत्र हलविण्याचा प्रयत्न झाला, अशी टीका त्यांनी केली. प्रबोधिनीसाठी शासनाला सुप्रमा (सुधारित प्रशासकीय मान्यता) प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी यंत्रणांना दिल्या. पिंपरी सय्यद येथील 100 एकरांवर पीपीपीच्या माध्यमातून कृषी टर्मिनल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकरी संस्थांची मदत घेण्याचे निर्देश भुजबळांनी बैठकीत यंत्रणांंना दिले.

साहसी क्रीडा केंद्र सुरू करा
हॉटेल ग्रेपसिटी पार्क येथील साहसी क्रीडा केंद्र नागरिकांसाठी खुले करावे. खासगी संस्थांची त्यासाठी मदत घेण्याबाबत चाचपणी करावी. तसेच कन्व्हेन्शन सेंटरचे रखडलेले काम युद्धपातळीवर सुरू करण्याच्या सूचना भुजबळांनी केल्या. लासलगाव-विंचूर 16 गावे पाणीपुरवठा योजनेची तत्काळ दुरुस्ती करताना योजनेबद्दल शासनाला प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले. योजनेच्या दुरुस्तीपर्यंत आवश्यक तिथे पाणीपुरवठ्यासाठी टँकर उपलब्ध करून देण्याच्या सूचना भुजबळांनी केल्या.

हेही वाचा :

Back to top button