

येवला, पुढारी वृत्तसेवा : अननस खाल्ल्यावरून दोन अननस विक्रेत्यांचे आपापसात भांडण झाले. या दोघांच्या भांडणामध्ये मध्यस्थी करणाऱ्या एका ऊस रस विक्रेत्याचा डोक्यात चाकूचा वार करून खून केल्याची घटना येवला शहरात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोंगे विक्रेत्याच्या फिर्यादीवरून अननस विक्रेत्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील मयत व संशयित हे परप्रांतीय आहेत.
याप्रकरणी फिर्यादी असलेले मनोज राजकुमार कुशवाह, (वय-३० , धंदा-पोगें विक्री, मुळ रा. बिरमपुर ता. तिरवा, जि. कन्नोज राज्य उत्तरप्रदेश. हल्ली मुक्काम बुंदेलपुरा, येवला) हा शहरात सुमारे १० वर्षापासून बहिण सीमा व तिचे पती मनोजकुमार प्रभुदयाल कुशवाह यांच्यासोबत राहत आहे. फिर्यादी मनोज येवला शहरात व परिसरात पोगें विक्री करुन आपला उदरनिर्वाह करतो तर मयत मनोज प्रभुदयाल कुशवाह हे उसाच्या रस विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी आपल्या गावाकडची इतर मुल धंदा व रोजगारासाठी आणली असून येवला शहर परिसरात अननस विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता.
याच दरम्यान गुरूवारी (दि. ३०) रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी मनोज आणि मयत मनोज प्रभुदयाल कुशवाह हे जेवण करुन बसलले असताना त्यांच्यासोबत राहत असलेला गुलाबसिंग याने मनोजने आणलेले अननस खाल्ले असून त्याने भांडण केल्याचे सांगितले. यानंतर मनोजने जावू दे. खाल्ले असेल तर खावू दे. त्याच्याशी वाद घालू नकोस असे म्हटले.
यानंतर ब्रिजेशकुमार रमाशंकर कुशवाह हा खोलीवर आल्यावर पुन्हा गुलाबसिंगसोबत वाद घालू लागला. यानंतर देखील दोघांनी त्यास वाद घालू नकोस असे समजावले होते. याच दरम्यान मनोजकुमार यांने ब्रिजेशकुमार याला हाताने मारत 'तू आता येथून निघून जा. आपण सकाळी बघू' असे सांगत त्याला हकलून दिले. यावेळी तो तेथून निधून गेला.
यानंतर मात्र, ब्रिजेशकुमार पुन्हा ९.३० वाजण्याच्या सुमारास मनोज प्रभुदयाल कुशवाह याच्या घराजवळ आला. यावेळी फिर्यादी मनोज राजकुमार कुशवाह, मनोजकुमार, कमलेशे कुषवाह, विजय कुशवाह, दिलीप कुशवाह असे घरासमोर रोडवर उभे असताना ब्रिजेशने रागाचे भरात मनोजच्या डोक्यात चाकुने वार केला. यानंतर मनोजच्या डोक्यातून रक्तत्राव होवू लागल्याचे दिसताच ब्रिजेशने तेथून पळ काढला.
यानंतर जखमी मनोजकुमारला इतरांनी गाडीतून पारेगाव येवला येथील दवाखान्यात आणले. तेथील डाँक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी कोपरगाव सरकारी दनाखान्यात नेण्यास सांगितले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
येवला शहर पोलिसांनी ब्रिजेशकुमार रमाशंकर कुशवाह याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद मनोज राजकुमार कुशवाह यांनी पोलिसात दिली आहे.
हेही वाचलंत का?