पुढारी ऑनलाईन डेस्क : विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली इतिहास रचणाऱ्या टीम इंडियाने सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 113 धावांनी पराभव केला. त्याचबरोबर सेंच्युरियनमध्ये कसोटी सामना जिंकणारा टीम इंडिया हा आशियातील पहिला क्रिकेट संघ ठरला. तसेच, विशेष बाब म्हणजे या विजयासह विराट कोहली दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर दोन कसोटी सामने जिंकणारा एकमेव भारतीय कर्णधार ठरला आहे. विराटपूर्वी कोणत्याही भारतीय कर्णधाराने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर एकाहून अधिक कसोटी सामने जिंकलेले नाहीत. कोहलीच्या आधी, महेंद्रसिंग धोनी आणि राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेत १-१ कसोटी सामने जिंकले.
दक्षिण आफ्रिकेतील या ऐतिहासिक विजयानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी टीम इंडियाला विजयासाठी शुभेच्छा दिल्या. पण, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याचे नावही घेतले नाही. गांगुलीने आपल्या ट्विटमध्ये इतिहास रचणाऱ्या भारतीय कर्णधार विराट कोहली याचे कुठेही नाव घेतलेले नाही. दुसरीकडे, टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सेंच्युरियन कसोटी सामन्यातील नेत्रदीपक विजयाबद्दल टीम इंडिया आणि विराट कोहली दोघांचेही अभिनंदन केले आहे.
गांगुली आपल्या ट्विटामध्ये म्हणतात की, सेंच्युरियन येथे भारताचा हा पहिला कसोटी विजय आहे. ही एक ऐतिहासिक कामगिरी असून टीम इंडियाचा शानदार विजयाने उत्साह संचारला आहे. पण असे असले तरी निकालाने मला अजिबात आश्चर्य वाटले नाही. सेंच्युरियन सामन्यात भारताचे पारडे जड होते. या सामन्यातील टीम इंडियाचा परफॉर्मन्स पाहुन या मालिकेत भारताला हरवणे खूप कठीण असल्याचे दिसत आहे. भारताचा पराभव करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला आपल्या मर्यादेबाहेरची कामगिरी करावी लागली. नवीन वर्षाचा आनंद घ्या…', असे कौतुकोद्गार काढले आहेत.
या वर्षी सुरुवातीला गाबा येथे ऑस्ट्रेलियाला, लॉर्ड्स येथे इंग्लंड आणि आता सेंच्युरियन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संस्मरणीय विजय मिळवून टीम इंडियाने इतिहास रचला आहे.
विराट कोहलीचा कर्णधारपदाचा विक्रम पाहिला, तर कर्णधार म्हणून परदेशात त्याची ही ३५वी कसोटी होती. यातील १६ सामन्यंमध्ये विजय मिळाला असून १३ सामन्यांमध्ये पराभव स्विकारावा लागला आहे. तर ६ कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत. एकूण रेकॉर्ड पाहता विराटने ६७ सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. यादरम्यान भारताने ४० सामन्यात विजय मिळवला आहे. तर १६ सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. असेच ११ सामने अनिर्णित राहिले आहेत. टीम इंडियाने २०१८ साली विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली जोहान्सबर्ग कसोटी जिंकली होती. आता २०२१ च्या शेवटी सेंच्युरियनमध्येही संघाला विजय मिळवून दिला आहे. इंग्लंड दौ-याबद्दल बोलायचे झाले तर २०१८ मध्ये टीम इंडियाने ट्रेंट ब्रिज येथे टेस्ट जिंकली आणि त्यानंतर २०२१ मध्ये टीम इंडियाने लॉर्ड्स आणि ओव्हलवर टेस्ट जिंकली. ऑस्ट्रेलियामध्ये, भारतीय संघाने २०१८ मध्ये मेलबर्न आणि अॅडलेड कसोटी सामने जिंकले.
अलीकडे टीम इंडियामध्ये कर्णधारपदावरून मोठे नाट्य रंगले होते. त्यामुळे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि विराट कोहलीमध्ये अप्रत्यक्षपणे वाद झाला होता. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बीसीसीआयच्या निवड समितीने विराट कोहलीला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवल्याचे ट्विटरवरून जाहीर करण्यात आले. त्यानंतर मुलाखतीदरम्यान बोर्डाचे अध्यक्ष गांगुली यांनी मोठे विधान केले. ते म्हणाले की, विराटला टी-२० संघाचे कर्णधारपद सोडू नकोस असे सांगितले होते, पण त्याने आमचे म्हणणे ऐकले नाही. निवडकर्त्यांना टी २० आणि वनडे टीमसाठी वेगवेगळे कर्णधार नको होते. त्यामुळे त्यांनी सध्या टी २० संघाचा कर्णधार रोहित शर्माकडे वनडे संघाचेही नेतृत्व सोपविल्याचे त्यांनी सांगितले. गांगुलींच्या या विधानानंतर मात्र, विराट कोहली संतप्त झाला आणि थेट पत्रकार परिषद घेऊन चक्क बोर्डाचे अध्यक्षांना खोटे पाडत शिंगावर घेतले. त्याने भर पत्रकार परिषदेत मला कुणीही टी २० संघाचे कर्णधारपद सोडू नये, अशी विनंती केली नव्हती. उलट मी राजीनामा देणार आहे असे म्हटल्यावर तो लगेचच सिकारला, असे त्याने म्हटले होते. दरम्या, दोघांच्या वेगवेगळ्या विधानानंतर भारतीय क्रिकेट विश्वात एकच खळबळ माजली होती. अनेक माजी क्रिकेटपटूंनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली. तर अनेकांनी मोलाचे सल्लेही देत दोघांची कानउघडणी केली.