

पोलिस असल्याचे सांगून वयोवृद्ध व्यवसायिकाकडील सोन्याचे दागिने हातोहात लंपास करण्यात आले. धनतेरसच्या दिवशीच धन लंपास करण्याची ही घटना घडली असून शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ७५ वर्षीय मानकचंद मुरलीधर चितलांगे (रा. प्लॉट क्र. ०६ विदयानगर समोर धुळे रोड नंदुरबार ) हे व्यापारी 2 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी नंदुरबार शहरातील पृष्टिधाम मंदिरासमोर साईपुरा भागातून जात होते. मोटारसायकल आलेल्या एकाने त्यांना थांबवले. त्या अनोळखी व्यक्तीने 'महाराष्ट्र पोलीस क्राईम ब्रांच' असे ठळक छापलेले ओळखपत्र दाखवून बतावणी केली की, आम्ही क्राईम ब्रॉन्चचे पोलीस आहोत. रात्री दोन लाखाचा गांजा पकडलेला आहे. त्यामुळे आम्ही चेकिंग करत आहोत. तपासणी घेत असल्याने तुम्ही तुमच्या अंगावरील मुल्यवान वस्तू काढून रूमालामध्ये ठेवा, असेही सांगितले.
चितलांगे यांचा हातरूमाल काढून त्यात दोन सोन्याच्या अंगठ्या, डायरी, मोबाईल पैसे ठेवले त्या व्यक्तीने सगळया वस्तू रूमालात बांधून चितलांगे यांना परत दिल्या व पुढील दोन दिवस अशा मुल्यवान वस्तु घालून फिरू नका,असे सांगितले. यानंतर चितलांगे हे दामोदर प्रिंटींग प्रेसवर वह्या घेण्यासाठी गेले. तिथे वहया घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या बांधलेला रुमाल सोडून पाहिला असता त्यातील सोन्याच्या वस्तू गायब होत्या. त्यांना वाटले की, दोन सोन्याच्या अंगठ्या दुकानात खाली पडल्या असतील म्हणून जावून शोधल्या पंरतू सापडल्या नाहीत तेव्हा त्यांना लक्षात आले की, आपली फसवणूक झाली आहे.
तोतया पोलिसाने रुमालात बांधलेली रोख रक्कम, मोबाईल, घड्याळ कोणत्याही किमती वस्तूला हात न लावता फक्त सोन्याच्या वस्तू गायब केल्या. माणकचंद चितलांगे यांनी घरी येऊन मुलाला घडलेली घटना कथन केली. तथापि घाबरले असल्याने त्यांनी २० नोव्हेंबर रोजी फिर्याद दिली. ०७ ग्रॅमची व एक ०८ ग्रॅमची अशा ३५,००० रु. किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठया तोतया पोलिसांनी लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाची नोंद शहर पोलिस ठाण्यायात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.