सोन्याचे दर : सोन्याला झळाळी दराची चढती कमान | पुढारी

सोन्याचे दर : सोन्याला झळाळी दराची चढती कमान

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

लग्नसराई सुरू होत असतानाच सोन्याचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी चोख सोन्याचे दर 50,800 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचले. सराफी व्यावसायिकांच्या मते हेच दर पुढील काही आठवड्यात 53 ते 55 हजारांवर जाण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात सातत्याने दर वाढत असून हा आलेख अजून उंचावत जाण्याची शक्यता सराफ व्यावसायिकांनी वर्तवली. लग्नसराईमुळे मागणी व पुरवठ्याचा परिणाम, शेअर बाजारातील घसरण ही कारणे सोन्याचे दर वधारण्यामागे असल्याचे सांगण्यात येते.

विशेष म्हणजे, लग्नसराईच्या अनुषंगाने दागिन्यांना मोठी मागणी असून दागिन्यांसाठीच्या 22 कॅरेट सोन्याचा दर प्रतिदहा ग्रॅमकरिता 49 हजार रुपयांच्या आसपास असून चांदीचे दरही तेजीत आहेत. शनिवारी प्रतिकिलो चांदी 66 हजार रुपये होती. गतआठवड्यात चांदी दरात 600 रुपयांची प्रतिकिलोमागे घसरण झाली असून 24 कॅरेट सोने दरात मात्र 500 रुपये प्रतिदहा ग्रॅममागे दरवाढ झाली आहे.

मागील वर्षी कोरोना काळात सोन्याचे दर विक्रमी 55 हजारांवर पोहोचले होते. जे मागील वर्षीच ऑगस्टमध्ये मोठ्या प्रमाणात खालीही आले होते. कोरोनाच्या सावटाखाली मर्यादित संख्येत लग्न समारंभ करावे लागत असल्याने हौस-मौज करता येत नव्हती; मात्र आता वातावरण निवळत असल्याने लोक खर्चही करण्यास धजावत असून साखरपुडा, लग्न आणि त्यानंतरच्या स्वागत समारंभासाठी लागणार्‍या वेगवेगळ्या दागिन्यांना पसंती दिली जात आहे.दिवाळीपासूनच सराफ बाजार तेजीत असून लग्नसराईनिमित्त आता पेढ्याही गजबजू लागल्या आहेत.

Back to top button