महेंद्रसिंह धोनी ( Mahendra singh dhoni ) म्हटलं की, आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज हा संघच समोर येतो. इतक धोनी आणि चेन्नईमधील नात घट्ट आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व करणारा धोनी याने आयपीएलमधून निवृतीचा सामना कोणत्या स्टेडियमवर खेळण्यास आवडले हे स्पष्ट केले आहे.
यापूर्वी महेंद्रसिंह धोनी ( Mahendra singh dhoni ) याने आणखी एक आयपीएल हंगाम हा चेन्नईची जर्सी घालून खेळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आता त्याने म्हटलं आहे की, चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर आयपीएलमधील शेवटचा सामना खेळायचा आहे. माझी आयपीएलमधील निवृत्ती पुढील वर्षी होईल की आणखी पाच वर्षांनी हे मला माहिती नाही, असेही त्याने स्पष्ट केले आहे.
आयपीएल ट्रॉफी विजयानिमित्त शनिवारी चेन्नई येथील कार्यक्रमात बोलताना धोनी म्हणाला, मी नेहमी क्रिकेटलाच सर्वस्व मानले. त्याचबरोबर यासाठी नियोजनही केले. भारतीय संघाकडून खेळताना मी माझा अंतिम सामना रांची येथे खेळला होता. मी मूळचा रांची असल्याने येथील मैदानावर मी भारतीय संघासाठी शेवटचा सामना खेळला, असेही त्याने नमूद केले.
चेन्नई सुपर किंग्ज संघाचे चाहते तामिळनाडूसह देशात सर्वत्र आहेत. आम्ही विदेशात खेळत असलो तरी त्यांचे आम्हाला समर्थन मिळते. मागील दोन वर्ष आमची कामगिरी समाधानकारक झाली नाही. या काळात सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा ही चेन्नई सुपर किंग्ज या संघाबद्दलच झाली. यामुळे २०२१च्या आयपीएल स्पर्धेत आम्ही पुन्हा कमबॅक करु शकलो. संघ सहकार्यामुळे आम्ही ही कामगिरी करु शकलो, असेही धोनी म्हणाला.
आयपीएल हे क्रिकेटसाठी मोठे व्यासपीठ आहे. माजी क्रिकेटपटू, माझे संघातील सहकारी आणि बीसीसीआयने क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाबद्दल मी त्यांचे आभार मानतो. काळानुसार क्रिकेटमध्ये बदल झाला आहे. हा बदल स्वीकारल्यामुळेच आज क्रिकेट हा लोकप्रिय खेळांपैकी एक आहे, असेही त्याने या वेळी सांगितले.