नंदुरबार : मोर्चा काढणाऱ्या जमावाविरुद्ध गुन्हा दाखल | पुढारी

नंदुरबार : मोर्चा काढणाऱ्या जमावाविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार; पुढारी वृत्‍तसेवा

त्रिपुरातील धार्मिक हिंसाचाराच्या घटनेचे पडसाद नंदुरबार जिल्ह्याच्या अक्कलकुवा तालुक्यात देखील उमटले. या ठिकाणी परवानगी नसतानाही निषेध मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला गेला. या प्रकरणी पंचवीस जणांच्या जमावाविरुद्ध नंदुरबार च्या अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिपुरा राज्यातील कथित घटनेचा निषेध म्हणून मुस्लिम समाजातील काही कार्यकर्त्यांनी मोर्चा काढण्याचा आग्रह धरला. अक्कलकुवा पोलिसांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मात्र मुस्लिम समाजाच्या वरिष्ठांनी फक्त निवेदन देऊन निषेध नोंदविण्याचे व शांतता राखण्याचे आवाहन केले होते. तथापी अक्कलकुवा येथील हॉटेल फ्रेंड पासून मोलगी नाक्याच्या मार्गे तहसील कार्यालयावर रॅली नेण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून संबंधितांवर गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी मोहसीन रफिक मक्राणी, रईस अली शेख, हमजु मोहम्मद मक्राणी, मुल्ला अल्लारखा नमुद मक्राणी, जुनेद अमीन मक्राणी, बिलाल युसुफ मक्राणी, लाला रफिक मक्राणी, मुफतलीक मुसा मक्राणी, शोएब शफि मोहम्मद मक्राणी, साजीद छोटुखॉ पिंजारी, राजू शेरू मक्राणी, युनुस शौकत मक्राणी, जाकीर शेख पूर्ण नाव माहित नाही सर्व रा. अक्कलकुवा (जि. नंदुरबार) व इतर १० ते १५ इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती देण्यात आली आहे.

या विषयी अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलिस नायक अमोल खवळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, राज्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दि. ३१/१०/२०२१ ते दि. १४/११/२०२१ पावेतो जमावबंदीचा आदेश जारी केलेला आहे.

असे असताना देखील विना परवानगी रॅली काढली. तसेच तोंडाला मास्क न लावता नमूद आदेशाचे उल्लंघन केले, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर हे करीत आहेत.

Back to top button