अमरावती तणाव : घटना त्रिपुरातील, आंदोलन महाराष्ट्रात कशासाठी?, गृहमंत्र्यांचा सवाल | पुढारी

अमरावती तणाव : घटना त्रिपुरातील, आंदोलन महाराष्ट्रात कशासाठी?, गृहमंत्र्यांचा सवाल

मुंबई; पुढारी ऑनलाईन

अमरावती तणाव : त्रिपुरामधील घटनेच्‍या निषेधार्थ शुक्रवारी अमरावती जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मार्चा काढण्‍यात आला होता. यावेळी काही दुकानांची तोडफोड करण्‍यात आली होती. या घटनेच्‍या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाने शनिवारी अमरावती बंदचे आवाहन केले होते. या बंदला हिंसक वळण लागले. शहरातील इतवारा भागात आंदोलकांनी काही गाड्यांची तोडफोड केली. पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीचार्ज केला. शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. अमरावतीत शांतता प्रस्थापित करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. शांतता निर्माण व्हावी यासाठी सर्वांनी मदत करावी. समाजात द्वेष निर्माण करण्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा गृहमंत्र्यांनी दिला आहे.

अमरावतीतील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपण विरोधी पक्षातील नेत्यांशी चर्चा केली आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सोशल मीडियातून मेसेज फिरत आहे. या माध्यमातून सामाजिक द्वेष पसरणार नाही याची काळजी घ्यायला हवी. कोणीही कायदा हातात घेऊ नये. त्रिपुरामध्ये घटना घडली. त्यासाठी महाराष्ट्रात आंदोलन करण्याची आवश्यकता नव्हती. लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांनी सांगण्यात आले आहे, असे गृहमंत्री वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

अमरावती तणाव : कडेकोट पोलिस बंदोबस्‍त तैनात

त्रिपुरामध्‍ये अल्‍पसंख्‍याकांवरील अत्‍याचाराच्‍या निषेधार्थ शुक्रवारी अमरावती जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मार्चा काढण्‍यात आला होता. चित्रा चौक ते मालवीय चौकादरम्‍यान काही दुकानांवर दगडफेक करत वाहनांची तोडफोड केली होती. यामुळे शहरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. या हिंसाचाराच्‍या निषेधार्थ आज भाजपने अमरावती बंदची हाक दिली होती. शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला होता.

हे ही वाचा :

Back to top button