नाशिक : बालसुधारगृहातील कर्मचाऱ्यास मारहाण, चार मुलांचे पलायन | पुढारी

नाशिक : बालसुधारगृहातील कर्मचाऱ्यास मारहाण, चार मुलांचे पलायन

मनमाड ; पुढारी वृत्‍तसेवा :

गंभीर गुन्ह्यातील चार अल्पवयीन आरोपी मुलांनी बालसुधारगृहात कर्मचाऱ्यास मारहाण केली आणि ते फरार झाल्याची खळबळजनक घटना मनमाड शहरात घडली. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर फरार झालेल्या आरोपी मुलांचा शोध घेण्यात येत आहे. बालसुधारगृहा मधील अल्‍पवयीन मुले फरार झाल्‍याने शहरात खळबळ उडाली आहे.

या बाबत अधिक वृत्त असे की, शहरातील कॅम्प भागात शासकीय बाल सुधार गृह (रिमांड होम) असून, त्यात घरातून पळून आलेले निराधार आणि वेगवेगळ्या गुन्ह्यात आढळून आलेल्‍या अल्पवयीन मुलांना ठेवले जाते. नाशिक येथे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या तीन बाल अल्पवयीन आरोपींना न्यायालयाच्या आदेशानुसार बाल सुधार गृहात दाखल करण्यात आले होते.

चौघांची कर्मचाऱ्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण

अगोदर या बाल सुधारगृहात 17 मुले होती. ही तीन मुले आल्यानंतर संख्या 20 झाली. या मुलांना काल (शुक्रवार) रात्री जेवण देण्यासाठी बालसुधारगृहातील कर्मचारी योगेश बोदडे हा गेला. यावेळी बोदडे यांच्यावर नुकतेच दाखल झालेल्‍या 3 आणि अगोदर असलेला एक अशा 4 आरोपी मुलांनी हल्ला चढवला. यावेळी या चौघांनी मिळून कर्मचारी बोडदे याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

बालसुधारगृहाच्या गेटवरून उड्या मारून पसार

यानंतर ते बालसुधारगृहाच्या गेटवरून उड्या मारून पसार झाले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. चार बाल अल्पवयीन आरोपी फरार झाल्याची माहिती मिळताच रिमांड होम प्रशासन खडबडून जागे झाले. प्रशासनाने तात्‍काळ पळालेल्‍या अल्पवयीन मुलांचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ते आढळून आले नाहीत.

यानंतर बँकेकडून पोलिस स्‍टेशनमध्ये तक्रार करण्यात आली. रिमांड होममधून चार अल्पवयीन आरोपी फरार झाल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी तातडीने रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड यासह शहरातील वेगवेगळ्या भागात जाऊन आरोपींचा शोध घेतला.

मात्र ते सापडले नाहीत. या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमानव्ये गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेण्यासाठी एक पथक नाशिकला पाठविण्यात आले आहे. या अगोदर देखील या बाल सुधार गृहातून आरोपी मुले पळून गेल्याच्या घटना घडल्‍या असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे रिमांड होम मधील कर्मचारी करतात तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Back to top button