आर्यन खान ड्रग्ज प्रकरण : काळजी वाढवणारा ‘कॉन्शियस पझेशन’ | पुढारी

आर्यन खान ड्रग्ज प्रकरण : काळजी वाढवणारा ‘कॉन्शियस पझेशन’

- अ‍ॅड. दीपा चौंदीकर

आर्यन खान ड्रग्ज प्रकरण सध्या जोरात चर्चेत आहे. या प्रकरणात तो दोषी आहे की निर्दोष, हे समजायला अजून वेळ लागेल; मात्र या प्रकरणाने नार्कोटिक्स ड्रग्जशी व्यवहारांसंदर्भातील कायद्यातील (एनडीपीएस) काही तरतुदींवर चर्चा करणे आवश्यक बनले आहे. या कायद्यानुसार, अंमली पदार्थांची केवळ विक्री करणे किंवा त्याचे सेवन करणे एवढाच गुन्हा होत नाही, तर कोणत्याही कारणावरून अंमली पदार्थांशी जोडले जाणे या कायद्याने गुन्हा ठरतो. प्रत्येक वेळी संबंधितांचा त्यात थेट सहभाग असलाच पाहिजे, असे नाही. अप्रत्यक्ष किंवा दुरून जरी अंमली पदार्थांशी संपर्क किंवा संबंध आला, तरी तो गुन्हा ठरतो. आर्यनपुरता विचार केला, तर ज्या क्रूझवर अंमली पदार्थ मिळाले, तेथे आर्यन उपस्थित होता. ज्याच्याकडे अंमली पदार्थ मिळाले, तो आर्यनचा मित्र होता. म्हणजेच येथे आर्यनचा अंमली पदार्थांशी कोणत्या ना कोणत्या कारणाने संबंध आला. थेट त्याच्याकडे हे पदार्थ नसले, तरी अप्रत्यक्षपणे तो या प्रकरणाशी संबंधित असल्याने त्याच्यावर या कायद्यान्वये कारवाई झाली.

आर्यन खान याच्या अटकेनंतर या कायद्याची कधी नव्हे इतकी चर्चा झाली. अंमली पदार्थांसदर्भातील कायद्याचे कलम 35 हे नीट समजून घेण्याची गरज आहे. हे कलम ‘कॉन्शियस पझेशन’संदर्भात आहे. ‘कॉन्शियस पझेशन’ म्हणजे एखादी गोष्ट आपल्या आसपास आहे, याची जाणीव असणे. अंमली पदार्थांच्या प्रकरणात एखाद्याने अंमली पदार्थ प्रत्यक्ष बाळगला नसला, तरी हा पदार्थ आपल्या आसपास आहे, याची जाणीव त्याला असेल, तरीही तो गुन्हा ठरतो. कोणत्याही मार्गाने अंमली पदार्थांच्या संपर्कात आल्यास या कलमानुसार तो गुन्हा मानला जातो. मला माहीत नव्हते, हा बचाव होऊ शकत नाही. आर्यनच्या वकिलांना यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी लागली. अ‍ॅड. मुकुल रोहोतगी यांनी आर्यन खान याची अटकच बेकायदेशीर असल्याचा दावा करून फौजदारी कायद्याच्या कलम 50 आणि राज्यघटनेचे कलम 22 आदींचे उल्लंघन झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. एनसीबीकडून आर्यनची वैद्यकीय तपासणी केली नसल्याचा मुद्दाही त्यांनी जोरकसपणे मांडला. व्हॉटस् अ‍ॅप चॅटही पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नसल्याचे त्यांनी नमूद केले. अंमली पदार्थांशी आर्यनचा काहीच संबंध नाही, हे पटवून देण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागली.

फौजदारी प्रक्रियेत किंवा भारतीय पुरावा कायद्यात ‘रेलेव्हन्सी ऑफ फॅक्टस्’ म्हणजेच तथ्यांच्या सहसंबंधांना खूप महत्त्व आहे. त्यामुळे ‘कॉन्शियस पझेशन’मध्ये एखादी व्यक्ती सापडली असेल, तर तथ्यांच्या सहसंबंधांना खूप महत्त्व प्राप्त होते. अंमली पदार्थांच्या प्रकरणात हे पदार्थ कोठे मिळाले, कोणाकडे मिळाले, कधी मिळाले, त्या क्षणाला तेथे कोण कोण उपस्थित होते, त्यातील प्रत्येकाचे एकमेकांशी असलेले परस्पर संबंध कसे आहेत, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण ठरतात. परस्पर संबंधातून अनेक नवी तथ्ये समोर येत राहतात. अशा वेळी ‘रेलेव्हन्सी ऑफ फॅक्टस्’ हा घटक निर्णायक ठरतो. आर्यनच्या संदर्भातही हा मुद्दा खूप महत्त्वाचा ठरला. सरकारी पक्षाने ‘कॉन्शियस पझेशन’वर भर दिला. आर्यनने अंमली पदार्थांचे सेवन केले असते, तर वैद्यकीय तपासणीची गरज होती; मात्र या ठिकाणी संशयित आर्यन ‘कॉन्शियस पझेशन’मध्ये होता. आपल्या मित्राकडे अंमली पदार्थ आहेत, हे त्याला माहीत होते. विशेष म्हणजे, हे दोघे बालमित्र आहेत आणि एकत्र प्रवास करत होते, या मुद्द्यांवर भर देत कायद्याच्या कलम 35 वर लक्ष केंद्रित केले होते. आर्यनकडे अंमली पदार्थ मिळाले नाहीत, याचा अर्थ त्याचा या प्रकरणाशी काहीच संबंध नाही, असे होत नाही. अशा प्रकरणात परस्पर संबंध तपासले जातात. शौविक चक्रवर्ती विरुद्ध स्टेट हा खटला अभ्यासला, तर हे परस्पर संबंध कशा पद्धतीने निर्णायक ठरतात, हे समजू शकते.

भविष्यात एखादा निरागस तरुण मित्रांसोबत पार्टीला म्हणून गेला आणि तिथे अंमली पदार्थांचा वापर झाला, तर त्याचा हकनाक बळी जाऊ शकतो. अशा वेळी त्याच्यावर या कलमाने अन्याय होऊ नये, याची काळजी घ्यावी लागेल. आपण निर्दोष आहोत, हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्याचीच असेल. कायदेशीर प्रक्रियेत या सर्व बाबी सिद्ध होईपर्यंत त्याची उमेदीची वर्षे निघून जातील. आर्यनलाही जामीन मिळेपर्यंत म्हणजे आपण ‘कॉन्शियस पझेशन’मध्ये नव्हतो, हे न्यायालयाला पटवून देईपर्यंत 25 दिवस तुरुंगात राहावे लागले. याचाच अर्थ या कायद्यातील कलम 35 चा वापर खूपच जपून केला जावा, अशी अपेक्षा आहे. कायदे कितीही चांगले असले, तरी शेवटी त्याचा वापर कोणत्या हेतूने होतो, यावरच त्याची परिणामकारकता आणि उपयुक्तता सिद्ध होत असते.

Back to top button