नाशिक : शहरातील मान्सूनपूर्व कामे थंड; अधिकारी कागदावरच थोपटतात दंड

नाशिक : शहरातील मान्सूनपूर्व कामे थंड; अधिकारी कागदावरच थोपटतात दंड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कोणत्याही क्षणी मान्सूनचे आगमन होईल, अशी स्थिती असताना शहरातील मान्सूनपूर्व कामे अद्यापपर्यंत निम्मेही झाले नसल्याची स्थिती आहे. अधिकाऱ्यांकडून कागदावरच कामे झाल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात या कामांच्या पूर्तीची बोंब असल्याचे चित्र आहे. दरम्यान, महापालिकेच्या प्रभारी आयुक्त भाग्यश्री बानायत यांनी कामांचा आढावा घेत, कामे वेगाने पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सोमवारी (दि. १९) सर्व विभागप्रमुखांची बैठक आयुक्त कार्यालयात पार पडली. यात मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेण्यात आला. नालेसफाई पूर्ण करा, पूररेषा तपासून तेथील आणि नदीपात्राजवळचे अतिक्रमण हटवा तसेच सार्वजनिक ठिकाणे आणि मोकळ्या जागांवरही अतिक्रमण होणार नाही यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. शहरातील पाणी साचणाऱ्या ठिकाणांची माहिती घेऊन पूर्वतयारी करावी आणि खड्डे बुजविण्याची कार्यवाही करण्याबाबतचे आदेश देण्यात आले. तसेच नदीकाठच्या टपरीधारकांना टपरी उचलून नेण्याबाबत समक्ष जाऊन मनपाकडून नोटिसा देण्यात येत असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. मनपाचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, प्रभारी आयुक्त बानायत यांनी, सर्व अधिकाऱ्यांनी ई-मूव्हमेंटची काटेकोर अंमलबजावणी करून कामे वेगाने पूर्ण करा, तक्रारींचा निपटारा करा. मनपाकडे प्राप्त तक्रारी, मुख्यमंत्री सचिवालय, पीएम पोर्टलवरील तक्रारी वेळेत निकाली निघतील या दृष्टीने खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी आयुक्तांनी करवसुलीचीही माहिती उपआयुक्तांकडून घेतली.

धोकादायक वाड्यांचा वीज, पाणीपुरवठा खंडित

धोकादायक वाड्यात राहणाऱ्या नागरिकांना नोटिसा देऊन वाडे रिकामे करण्याच्या सूचना दिल्या जात असल्या, तरी रहिवासी वाडे रिकामे करीत नसल्याची स्थिती आहे. पश्चिम विभागात ३७३ धोकादायक वाड्यांना नोटिसा देण्यात आल्या असून, वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याचे पत्र देण्यात आले आहे. सरकारवाडा, भद्रकाली पोलिस ठाण्यालाही धोकादायक वाड्यांची यादी देण्यात आली आहे. पूर्व विभागात अतिधोकादायक १७ आणि कमी धोकादायक १४ वाड्यांना नोटिसा देऊन पाणी, वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे, तर पंचवटी विभागात ९५ वाड्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.

अधिकारी होणार 'निक्षय मित्र'

प्रत्येक अधिकाऱ्याने पाच झाडे दत्तक घेऊन त्यांचे संगोपन करण्याची सूचना आयुक्तांनी केली. तसेच एका क्षयरुग्णाचा 'निक्षय मित्र' होऊन, त्या रुग्णाला सहा महिने पोषण आहाराचे वाटप करण्यासाठी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन आयुक्तांनी बैठकीत केले. त्याला सर्व अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला. क्षयरुग्णांना मदतीसाठी पुढे येणाऱ्या व्यक्ती, संस्थांना 'निक्षय मित्र' म्हटले जाते. दरम्यान, मनपाच्या यांत्रिकी विभागाने नुकतेच मलनिस्सारण प्रकल्प, पंपिंग स्टेशन, खत प्रकल्पात २०० झाडांचे वृक्षारोपण केले आहे. मनपाच्या उद्यान विभागाकडूनही यंदा शहरात २० हजार वृक्षारोपणाचे नियोजन आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news