सांगली : नालसाब मुल्लाचा खून सुपारी देऊन; सचिन डोंगरेविरुद्धही गुन्हा दाखल होण्याची शक्यता | पुढारी

सांगली : नालसाब मुल्लाचा खून सुपारी देऊन; सचिन डोंगरेविरुद्धही गुन्हा दाखल होण्याची शक्यता

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  येथील शंभरफुटी रस्त्यावरील राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता नालसाब मुल्ला याचा खून ‘सुपारी’ देऊन केल्याचा संशय आहे. तशी माहिती पोेलिसांना सोमवारी लागली आहे. दरम्यान अटकेत असलेल्या चौघांना न्यायालयाने पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. सध्या कारागृहात असलेला गुंड सचिन डोेंगरे यालाही या खुनात संशयित आरोपी होऊ शकतो, असे जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. बसवराज तेली यांनी दैनिक ‘पुढारी’ला सांगितले. दरम्यान, पोलिसांनी संशयिताकडून दोन पिस्तुल, एक एडका व दोन दुचाकी जप्त केल्या.

शनिवारी रात्री मुल्ला जेवण करून घराबाहेर बसला होता. त्यावेळी पाच संशयित आले. यातील दोन संशयितांनी मुल्लावर आठ वेळा गोळीबार केला. दुसर्‍या दोन संशयितांनी तलवारीने डोक्यात वार केले. यामध्ये मुल्ला याचा जागीच मृत्यू झाला. या खुनाचा अवघ्या 24 तासात छडा लावत सनी सुनील कुरणे (वय 23, रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ), विशाल सुरेश कोळपे (20, लिंबेवाडी), स्वप्निल संतोष मलमे (27, खरशिंग, ता. कवठेमहांकाळ) या तिघांसह एक अल्पवयीन संशयिताला अटक केली होती. सोमवारी दुपारी त्यांना पोलिस बंदोबस्तात न्यायालयात उभे करण्यात आले होते. न्यायालयाने तिघांना पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली. अल्पवयीन संशयिताची बाल सुधारगृहात रवानगी केली.

महेश नाईक खून प्रकरणात सचिन डोंगरेला अटक झाली होती. पोलिस चौकशीत नालसाब मुल्ला याच्या सांगण्यावरून नाईकचा खून केल्याची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी मुल्लाला अटक केली. यातून डोंगरे व मुल्लाला मोक्का लागला. मुल्ला जामिनावर बाहेर आला. पण तो डोंगरेवर चिडून होता. डोेंगरेमुळे ‘मला दोन वर्षे कारागृहात मुक्काम करावा लागला’, असे त्याला वाटत होते. त्यामुळे मुल्ला त्याच्यावर चिडून होता. तसेच त्याला जामीन होऊ नये, यासाठी प्रयत्न करीत होता. यातून डोेंगरे व मुल्लामध्ये खुन्नस सुरू झाली होता.
डोंगरेने या पाच जणांची मदत घेऊन मुल्लाचा ‘काटा’ काढल्याची प्राथमिक माहिती तपासातून पुढे आली आहे. पण खुनामागे दुसरे कारण असण्याची शक्यता आहे. मुल्लाचा ‘सुपारी’ देऊन खून केल्याची माहिती लागली आहे. त्याद्दष्टिने तपासला पुढील ‘दिशा’ देण्यात आली आहे. संशयितांना पोलिस कोठडी मिळाली आहे.

पिस्तूलचा पुरवठा; गोळीबाराचा सराव

अटकेत असलेल्या दोघांनी मुल्लावर आठ गोळ्या झाडल्या. यातील पाच गोळ्या त्याला लागल्या. संशयित 20 ते 22 वयोगटातील आहेत. त्यांना पिस्तुलांचा पंधरा दिवसांपूर्वी पुरवठा केल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. वय लहान असलेल्या या संशयितांनी पिस्तूल कसे चालवायचे, याबाबत सराव केला असण्याची शक्यता आहे.

Back to top button