कोल्हापूर : भाताच्या धूळवाफ पेरण्या वाया जाण्याची भीती | पुढारी

कोल्हापूर : भाताच्या धूळवाफ पेरण्या वाया जाण्याची भीती

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिथं मुसळधार पावसाची अपेक्षा होती, अशा कोल्हापूर जिल्ह्यात सध्या एक ते दोन मि.मी. या प्रमाणात पाऊस पडत आहे. चांगला पाऊस येईल या अपेक्षावर शेतकरी दररोज पावसाची वाट पहात आहे; पण शेतकर्‍यांच्या पदरी निराशा पडत आहे. यामुळे धूळवाफ पेरण्या पूर्णपणे थांबल्या आहेत, तर थोड्याशा ओलाव्यावर उगवून आलेले भाताचे कोंब उन्हांमुळे करपू लागले असून भाताची दुबार पेरणी करावी लागण्याची शक्यता आहे. नदी, विहिरीला पाणी कमी झाल्याने उसाला पाणी मिळत नाही, यामुळे ऊस पीक करपू लागले आहे. त्याचा परिणाम उसाची उंची खुंटण्यावर होत आहे. यामुळे शेतकरी दुहेरी कात्रीत सापडला आहे. जिल्ह्यात 12 हजार 57 हेक्टरवर भाताची पेरणी झाली आहे.

मृग नक्षत्रात पाऊस होईल, या अपेक्षेवर शेतकर्‍यांनी 7 जूनपर्यंत भाताची पेरणी पूर्ण केली. 10 जूननंतर मान्सून सक्रिय होईल, असा अंदाज व्यक्त केला होता; पण 19 जून संपला तरीही पाऊस नाही. यामुळे शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात 25 मेच्या पूर्वी सुमारे 3 ते 4 हजार हेक्टवर भाताची पेरणी झाली होती. त्याच दरम्यान जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली होती. त्यावेळी ज्यांनी भात पेरणी केली होती त्या भाताचे कोंब जमिनीत झालेल्या थोड्याशा ओलीवर उगवले होते, त्यानंतर आठ दिवसांनी पाऊस झाला असता ते कोंब उगवले असते; पण आठ ते दहा दिवस होऊनही पाऊस न झाल्याने ते भाताचे कोंब करपू लागले आहेत, करपलेले कोंब पुन्हा उगवण्याची शक्यता कमी असल्याने त्या जमिनीत दुबार पेरणीचे संकट निर्माण होणार आहे.

65 ते 70 मि.मी. पाऊस पडत नाही, तोपर्यंत शेतकर्‍यांनी पेरण्या करू नयेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर यांनी केले आहे.

उसाची वाढ खुंटली

गेली महिनाभर पाणी न मिळाल्याने माळ जमिनीतील उसाची वाढ खुंटली असून पीक करपू लागले आहे. पाऊस लागल्यानंतर ऊस उगवून येऊ शकतो; पण या दोन महिन्यांत ज्या दोन पेरांची वाढ होणार होती. ती खुंटली आहे. याचा फटका ऊस उत्पादनावर होणार आहे.

Back to top button