विद्यार्थ्यांना घरबसल्या मिळणार ‘प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट’ | पुढारी

विद्यार्थ्यांना घरबसल्या मिळणार ‘प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट’

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शिवाजी विद्यापीठाच्या आयटी सेल पदवी प्रमाणपत्र न स्वीकारलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट’ मिळवून देण्यासाठी नवीन अ‍ॅप विकसित केले आहे. जगभरातील विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना घरबसल्या ऑनलाईन प्रमाणपत्र मिळणार आहे. यामुळे शिक्षण, रोजगारासाठी विद्यार्थ्यांना येणार्‍या अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे.

विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधून पदवी, पदविका व पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरी, व्यवसायासाठी पदवी प्रमाणपत्राची आवश्यकता असते. व्यवसाय, नोकरीसाठी हे प्रमाणपत्र विद्यापीठातील संबंधित विभागातून प्रत्यक्ष उपस्थित राहून देण्यात येत होते. तथापि, आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि नोकरी, पुढील शिक्षणाच्या निमित्ताने परराज्य, परदेशात असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा सुरू केली आहे. हे प्रमाणपत्र ऑनलाईन स्वरूपात प्राप्त करण्यासाठी आवश्यक शुल्क पेमेंट गेटवे सुविधेने भरल्यानंतर तसेच अपलोड केलेल्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याचदिवशी हे पदवी प्रमाणपत्र ऑनलाईन स्वरूपात प्राप्त होणार आहे.

विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ऑनलाईन ‘ग्रीव्हन्स पोर्टल’

विद्यापीठ संलग्न महाविद्यालयामधून येणार्‍या विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात असणार्‍या वेगवेगळ्या शंका, अडचणी, समस्या दूर करण्यासाठी विद्यापीठात येण्याची आवश्यकता भासणार नाही. याकरिता ऑनलाईन ‘ग्रीव्हन्स पोर्टल’ अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना मोबाईल, संगणकद्वारे अ‍ॅपवर नोंद करता येईल. विद्यार्थ्यांच्या समस्या विद्यापीठाला ऑनलाईन स्वरूपात प्राप्त झाल्यानंतर तत्काळ सोडवणूक होण्याच्या द़ृष्टीने मदत होणार आहे.

Back to top button