लोकसभा निवडणुका मुदतपूर्व होण्याची चिन्हे : ॲड. प्रकाश आंबेडकर | पुढारी

लोकसभा निवडणुका मुदतपूर्व होण्याची चिन्हे : ॲड. प्रकाश आंबेडकर

जळगाव : लोकसभेच्या निवडणुका मुदतपूर्व होतील अशी चिन्हे दिसत आहेत. कारण भाजपने 48-48 लोकसभा मतदारसंघांवर निरीक्षक नेमले असून, ते कामाला लागले आहेत. यावरून लोकसभेच्या निवडणुका मुदतपूर्व होतील अशी शक्यता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.

प्रकाश आंबेडकर हे एका कार्यक्रमानिमित्त भुसावळ शहरात आले होते. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते म्हणाले, भाजपच्या शासनाने दोन हजार रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर लोकसभेच्या निवडणुका लवकरच होतील, असे प्रतिक्रिया म्हणून म्हणालो होतो. आता ती वस्तुस्थिती झाली आहे. भाजपमार्फत राज्यात 48 च्या 48 लोकसभा मतदारसंघांवर निरीक्षक नेमले गेले आहेत व ते कामाला लागले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुका ह्या मुदतपूर्व होतील, अशीच चिन्हे दिसत असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

काँग्रेसच्या भूमिकेमुळे संभ्रम

आम्हाला महाविकास आघाडीत शिवसेनेने आणले. उद्धव ठाकरेंसोबत आम्ही आहोत, त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीबरोबरच आहोत. मात्र नाना पटोले स्वबळावर निवडणुका लढण्याची घोषणा करतात. त्यामुळे आघाडीतील पक्षांमध्ये संभ्रम असून, काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी याबाबत खुलासा करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

देशात पॉलिटिकल हेट रेट्सची सुरुवात

भाजपच्या नऊ वर्षांच्या कालावधीत समाजातील वेगवेगळ्या घटनांमधील मतभेद करणारे चित्र निर्माण झाले आहे. यापूर्वी याचा राजकारणासाठी वापर झाला नव्हता; मात्र भाजपने याचा वापर सत्ता कशी राहील, यासाठी सुरू केल्याचे ते म्हणाले. देशात पॉलिटिकल हेट रेट्सची सुरुवात झाली आहे. भाजप, आरएसएस यांनी ती सुरुवात केलेली आहे. देशात मागील काळात ज्या काही क्रौर्याच्या घटना घडल्या. त्यात मारेकऱ्याचा जात, धर्मावर अधिकच जोर दिला जात आहे. यात विशेष म्हणजे मुस्लीम विरोध अधिकच दिसत असल्याच आरोप त्यांनी केला. सहा महिन्यांपूर्वी एसआयटीने शासनाला एक रिपोर्ट दिला होता. त्यात राज्यात दंगली कशा पद्धतीने होणार, कुठे होणार आहे याबद्दल सांगितले होते. हा रिपोर्ट सरकारने समोर आणावा. राज्यात हिंदू-मुस्लीम वाद वाढला पाहिजे, हा यामागचा मुख्य हेतू असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हेही वाचा :

Back to top button