बारामती : दूध दरप्रश्नी शेतकर्‍यांनी घेतली शरद पवार यांची भेट | पुढारी

बारामती : दूध दरप्रश्नी शेतकर्‍यांनी घेतली शरद पवार यांची भेट

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : दुधाच्या दराच्या प्रश्नासंबंधी जाणकार दूध उत्पादकांना सोबत घेत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्याचे आश्वासन ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी दिले. बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी त्यांनी दूध उत्पादकांशी चर्चा केली. कृषिभूषण अंकुश पडवळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात प्रा. येताळा भगत, संजय मेटकरी, हिम्मत भाकरे, सुनील नलवडे, शिवाजी चव्हाण, महेश पाटील, रविराज गावडे, इंद्रजित पवार, दादासो पवार आदींचा समावेश होता.

दूध दरातील घसरणीमुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. एक लिटर दुधाचा उत्पादन खर्च जवळपास 35 रुपये एवढा आहे. शेतकर्‍यांना 32 ते 33 रुपये एवढाच दूध दर मिळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चापेक्षा कमी दर दूध उत्पादकांना मिळत असल्याने शेतकर्‍यांचा पारंपरिक जोडधंदा असलेला हा व्यवसाय आतबट्ट्यात झाला आहे.

त्यामुळे या सर्व समस्या घेऊन अडचणीत आलेल्या सोलापूर, सातारा व पुणे जिल्ह्यांतील दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाने पवारांची बारामती येथे भेट घेतली. या वेळी पवार यांनी दूध दराच्या प्रश्नासंदर्भात दूध उत्पादक शेतकर्‍यांशी सखोल चर्चा केली. चर्चा झाल्यानंतर शेतकर्‍यांच्या समोरच मुख्यमंत्री कार्यालयात दूरध्वनीवरून संपर्क साधला व मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली. येत्या 10 ते 15 दिवसांत या प्रश्नावर मुखमंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन पवार यांनी दिले.

दुधातील सततची घसरण चिंताजनक आहे. दुधाला उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत असल्याने तरुण शेतकरी अस्वस्थ झाला आहे. त्यांना राज्य सरकारने प्रतिलिटर सरसकट 10 रुपये अनुदान द्यावे.

– अंकुश पडवळे, कृषिभूषण

हेही वाचा

दिव्यांगाचा कार्यालयात सत्याग्रह; हवेली तहसील प्रशासनाची धावपळ

शिर्डी संस्थानच्या कंत्राटी कर्मचार्‍यांना वेतनवाढ

वेल्हे : पुलावरून दुचाकी कोसळून दोन भाविक गंभीर जखमी

Back to top button