पुणे-दिल्ली विमानातील प्रवासी घामाघूम; काय आहे कारण ? | पुढारी

पुणे-दिल्ली विमानातील प्रवासी घामाघूम; काय आहे कारण ?

पुणे : विमानतळावरून बाहेरगावी जाणार्‍या प्रवाशांना रोज कोणत्या ना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विमानांची उशिरा होणारी उड्डाणे ही तर रोजचीच गोष्ट झाली आहे. शुक्रवारी प्रवाशांना नव्याच समस्येला सामोरे जावे लागले आहे. पुण्याहून दिल्लीला जाणार्‍या एअर एशिया कंपनीच्या विमानातील वातानुकूलित यंत्रणा बंद होती. त्यामुळे प्रवाशांना वाचण्यासाठी देण्यात येणार्‍या पुस्तकांचा हातपंखा करून वारा घ्यावा लागला . यासंदर्भातील व्हिडीओ ध्रुव चामरिया या प्रवाशाने ट्वीटरवर नुकताच शेअर केला आहे.

या वेळी त्याने वातानुकूलित यंत्रणा बंद असल्यामुळे आम्हाला गुदमरल्यासारखे होत असून, आम्ही घामाघूम झालो असल्याचे सांगितले. प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल एअर एशिया विमान कंपनीने दिलगिरी व्यक्त केली आहे. परंतु, दोन दिवसांपूर्वीच एअर एशिया कंपनीच्या पुण्याहून बंगळुरूला जाणार्‍या एका विमानाला त्रांत्रिक समस्या आली होती, त्यामुळे त्याच्या उड्डाणाला तब्बल 10 तास उशीर झाला होता.

या वेळी 100 प्रवासी अडकून पडले होते. त्याचा प्रवाशांना चांगलाच मनस्ताप झाला होता. यावेळी विमान कंपनीचे कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये मोठे वाद झाले होते. त्यामुळे विमान कंपन्यांनी आपल्या सेवेमध्ये तातडीने सुधारणा कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा

कात्रज डेअरीच्या अध्यक्षपदासाठी सात संचालकांचे गुडघ्याला बाशिंग

पुणे : विद्यापीठाच्या परीक्षांचे पालखीमुळे फेरनियोजन

पुणे : लाचखोरीमुळे अटक झालेला रामोड हा पहिला आयएएस

Back to top button