परिवर्त ग्रामीण मराठी साहित्य संमेलन : भाषिक वैविध्यता हीच भारताची खरी ताकद

निफाड : दुसर्‍या परिवर्त ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करताना मान्यवर.
निफाड : दुसर्‍या परिवर्त ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करताना मान्यवर.
Published on
Updated on

नाशिक (निफाड) : पुढारी वृत्तसेवा
विचारांचा वारसा हा जातीच्या पलीकडे असतो. सामान्यांना काय वाटते हे समोर ठेवून लेखन झाले पाहिजे. भारतीय संविधान जगातील एकमेव संविधान आहे, जे सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवते. भाषेच्या मुद्द्यावरून पाकिस्तान व बांगलादेशमध्ये दुरावा निर्माण झाला. मात्र, भारतात इतक्या भाषा असूनही देश एकसंध आहे, ही आपल्या देशाची खरी ताकद व संपत्ती आहे, असे परखड मत ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्यिक संजय आवटे यांनी व्यक्त केले.

दुसर्‍या परिवर्त ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात भारतीय संविधान आणि सद्यस्थिती या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. भारत केवळ हिंदूंचा नाही, तर तो प्रत्येकाचा आहे. हेच या देशाचे वेगळेपण आहे. त्यामुळे भारताचे वेगळेपण भावी पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. विचार किती शक्तिशाली आहे, हे अनुयायांपेक्षा मारेकर्‍यांना जास्त माहिती आहे, असेही त्यांनी नमूद केले. महापुरुषांचे अपहरण करण्याचे काम सध्या सुरू आहे. एक प्रकारे बाप पळवणारी टोळीच आली की काय, असे वाटू लागले आहे, असेही उपहासाने आवटे यांनी सांगितले. महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा मलीन करण्याचे काम सुरू आहे. हे चित्र थांबणे गरजेचे आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी यांच्यात भांडण होते, मात्र ते तात्त्विक होते. सध्या मात्र जाणीवपूर्वक चुकीचा इतिहास सांगितला जात आहे. त्यामुळे लष्करी तोयबापेक्षा लष्करी होयबांची भीती जास्त आहे, अशीही टिप्पणी त्यांनी केली. संमेलनाचा प्रारंभ माणकेश्वर वाचनालय येथून प्रबोधन दिंडी काढून झाला. ज्येष्ठ साहित्यिक व कवी प्रा. लक्ष्मण महाडिक संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारलेल्या न्या. रानडे ग्रंथदालनाचे उद्घाटन माजी आ. नानासाहेब बोरस्ते यांच्या हस्ते, तर विनायकदादा पाटील ग्रंथदालनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. ए. के. शिंदे यांच्या हस्ते झाले. महाविद्यालयाच्या मराठी विभागाकडून एस. जी. उफाडे व प्रा. महेश बनकर यांच्या मार्गदर्शनाने निफाड तालुक्यातील सर्व लेखकांच्या साहित्यकृतींचे प्रदर्शन भरवले होते.

कवी अनंत राऊत यांनी आपल्या कवितेतून भर दुपारच्या उन्हात संमेलनात सर्वांना गारव्याची अनुभूती दिली. या सत्रामध्ये शाहीर प्रसाद अंतरवेलीकर आणि पुस्तकांचे हॉटेलच्या संचालिका भीमाबाई जोंधळे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कविरत्न विवेक उगलमुगले व साहित्यरत्न मेघा जंगम यांना अनुक्रमे साहित्य व संशोधनासाठी सन्मानित केले. पहिल्या सत्राचे अध्यक्ष अनिल कुंदे यांनी शुभेच्छा दिल्या. प्रसंगी वि. दा. व्यवहारे, राजाभाऊ राठी, राजाभाऊ शेलार, मधुकर शेलार, नंदलाल चोरडिया, शशांक सोनी, प्रदीप पोळ, करुणासागर पगारे, माणिकराव गांगुर्डे आदी उपस्थित होते. तिसर्‍या सत्रामध्ये 'शेती-माती-माणूस आणि साहित्यातील प्रतिबिंब' या विषयावर आयोजित परिसंवादात डॉ. प्रतिभा जाधव व कवी संदीप जगताप यांनी विचार मांडले. अध्यक्ष कवी ऐश्वर्या पाटेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. सुरेश धारराव यांना गुणवंत शिक्षक, तर शारदा काळे यांना क्रीडारत्न पुरस्काराने सन्मानित केले. किशोर जाधव यांनी प्रास्ताविक, तर रोहित गांगुर्डे सूत्रसंचालन यांनी केले. चौथ्या सत्रात कवी प्रकाश होळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कविसंमेलन पार पडले. यामध्ये लक्ष्मण महाडिक, संदीप जगताप, प्रशांत केंदळे, माधव जाधव, शीतल कुयटे, देवीदास चौधरी, मंगला गोसावी, काशीनाथ वेलदोडे, अशोक बनसोडे, अशोक भालेराव, प्रदीप जाधव, गोकुळ आव्हाड, कैलास भामरे, दत्ता सोनवणे, संगीता शिरसाट, रवि गायकवाड, राजेंद्र गांगुर्डे, भूषण बोरस्ते, संजय आहेर, सोमनाथ कांगणे, अर्चना परदेशी, प्रकाश होळकर यांनी कविता सादर केल्या. या सत्रामध्ये दुर्मीळ ग्रंथ व वस्तूंचे संग्राहक नईम पठाण यांना निफाड भूषण, तर धनंजय वाबळे यांना कलारत्न पुरस्काराने सन्मानित केले. पाचव्या सत्रात शाहीर डॉ. गणेश चंदनशिवे आणि त्यांच्या सहकलाकारांनी प्रबोधन जलसा सादरीकरणातून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी विक्रम रंधवे होते. याप्रसंगी सुहास सुरळीकर यांना संगीतरत्न, तर रज्जाक शेख मास्टर यांना कलारत्न सन्मान प्रदान केला.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news