अहमदनगर जिल्ह्यात उष्माघाताने एकाचा बळी

जवळा : सध्या आग ओकणार्या उष्णतेच्या लाटेने सर्वत्र नागरिक हैराण आहेत. यातच काल एका शेतकर्याचा उष्माघाताने जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना जिल्ह्यातील गांजीभोयरे (ता. पारनेर) येथे घडली आहे. शेतकरी मच्छिंद्र गजानन झंजाड (वय 52) हे शेतात गुरे चारण्यासाठी गेले असता त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. 14) दुपारी घडली.
उन्हाच्या झळांनी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. मळ्यात शेजारी कुणीही नसल्याने त्यांना मदत लवकर मिळू शकली नाही. त्यांचा जागीच मृत्यू झाला. घरी का आले नाही म्हणून काही वेळाने घटनेची माहिती नातेवाइकांना मिळाली; परंतु तोपर्यंत उशीर झाला होता.