नाशिक : पांजरापोळमधील सात उंटांचा मृत्यू | पुढारी

नाशिक : पांजरापोळमधील सात उंटांचा मृत्यू

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
चुंचाळे येथील पांजरापोळच्या जंगलात संगोपनासाठी ठेवण्यात आलेल्या 111 पैकी तब्बल सात उंटांचा मृत्यू झाला असून, 104 येथे आश्रयाला आहेत. या उंटांच्या लसीकरणासह पॅकिंगची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाच्या पशुवैद्यकीय विभागाकडून सुरू करण्यात आली असून, सर्वच उंटांची शरीर प्रकृती तपासण्याचे काम सुरू आहे.

पांजरापोळ संस्थेकडून उंटांचे दररोजचे अन्न-पाणी यासह औषधोपचार तसेच उंटांच्या संगोपनाचे काम संस्थेकडून सुरू आहे. अशातच राजस्थान येथून शेकडो किलोमीटर पायी प्रवास करून येणार्‍या यातील काही उंटांची प्रकृती बिघडल्याने ते गंभीर जखमी होऊन अत्यवस्थ झाले होते. त्यासाठी पशुवैद्यकीय विभाग, मंगलरूप गोशाळा व पांजरापोळ संस्थेकडून उंटांवर उपचार सुरू करण्यात आले होते. उपचारादरम्यान पाच ते सहा दिवसांत आतापर्यंत 7 उंटांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील वातावरण उंटांसाठी सुरक्षित नसून उंट फार काळ पांजरापोळमध्ये जगू शकणार नाही. यासाठी उंटांना राजस्थानला पाठविण्याची तयारी सुरू झाली आहे. या उंटांना आपल्या मायदेशी घेऊन जाण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राजस्थान सरकारकडे पत्रव्यवहार करण्यात आल्यानंतर गुजरातच्या धरमपूर येथील श्रीमद राजचंद्र मिशन या संस्थेच्या वतीने उंटांच्या संगोपनासाठी तसेच हे उंट राजस्थानला पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसांत हे उंट राजस्थानला परतणार आहेत.

हेही वाचा:

Back to top button