अंतराळात सौरमंडळापेक्षाही मोठ्या आकाराच्या स्फोटाचा छडा | पुढारी

अंतराळात सौरमंडळापेक्षाही मोठ्या आकाराच्या स्फोटाचा छडा

लंडन : अंतराळाच्या अंतहीन पसार्‍यात कुठे कोणते अद्भूत द़ृश्य पाहायला मिळेल हे काही सांगता येत नाही. आता खगोलशास्त्रज्ञांनी अंतराळात आपल्या सौरमंडळापेक्षाही मोठ्या आकाराच्या स्फोटाचा छडा लावला आहे. हा आजपर्यंत पाहण्यात आलेला सर्वात मोठा स्फोट ठरला आहे. हा आगीचा गोळा आपली पृथ्वी ज्या सौरमंडळाचा एक हिस्सा आहे त्यापेक्षा शंभर पटीने अधिक मोठा आहे हे विशेष!
दूरवरील एका ब्रह्मांडात तीन वर्षांपूर्वी अचानक ही आग भडकली. ही घटना अत्यंत गुंतागुंतीची आणि अनपेक्षित आहे. ती समजून घेण्यासाठी अधिक अध्ययनाची गरज असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

या घटनेची माहिती रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या मासिक नोटिशीत देण्यात आली आहे. या महास्फोटाला ‘एटी 2021 एलडब्ल्यूएक्स’ असे नाव देण्यात आले आहे. अंतराळात ‘सुपरनोव्हा’चे स्फोट होत असतात. एखाद्या तार्‍याचा मृत्यू होत असताना असा स्फोट होऊन त्याच्यामधील इंधन सामग्री बाहेर उत्सर्जित होत असते. मात्र, असे ‘सुपरनोव्हा’ काही महिनेच चालू राहतात. हा महाविस्फोट गेल्या तीनपेक्षाही अधिक वर्षांपासून सुरूच आहे. त्यामुळे सामान्य सुपरनोव्हापेक्षाही ही घटना

वेगळी असल्याचे स्पष्ट झाले आहे. साऊथम्प्टन युनिव्हर्सिटीतील खगोलशास्त्रज्ञांनी म्हटले आहे की हा स्फोट वायूंच्या एका विशाल ढगामुळे झाला आहे. कदाचित तो आपल्या सूर्यापेक्षा हजारो पटीने मोठा आहे. त्याला एका विशाल कृष्णविवराने गिळंकृत केले आहे. हा स्फोट पृथ्वीपासून 8 अब्ज प्रकाशवर्ष अंतरावर झाला आहे. अजूनही शक्तिशाली दुर्बिणींच्या सहाय्याने त्याला पाहण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा प्रकारच्या अवकाशीय घटना अत्यंत दुर्मीळ असतात असे संशोधकांचे म्हणणे आहे.

Back to top button