विशेष : मातृत्वाचे ‘लीला’मृत | पुढारी

विशेष : मातृत्वाचे ‘लीला’मृत

ज्या स्त्रिया मजबूत इच्छाशक्तीच्या असतात, त्या कधीच परिस्थितीसमोर झुकत नाहीत. परिस्थिती कितीही बिकट बनली तरी त्या डगमगत नाहीत. स्त्री मुलाच्या पालनपोषणाची जबाबदारी समर्थपणे पेलू शकते. स्त्रीमध्ये ती क्षमता, योग्यता निसर्गतःच असते आणि पुरुष या गोष्टी समजू शकण्यास असमर्थच असतो. आईमुळेच कोणत्याही स्त्रीला समजून घेण्याची क्षमता माझ्यात आली आहे. आज (दि. 14) मातृदिन. त्यानिमित्ताने…

माझे आजोबा खूप श्रीमंत असामी होते. त्यांचा वाळकेश्वरला बंगला होता. पण 25 व्या वर्षापर्यंत ते दिवाळखोर झाले होते. त्यांना 200 स्क्वेअर फूटच्या घरात राहण्याची वेळ आली होती. तिथे केवळ एक बाथरूम होते आणि लोकांना स्वतःचा नंबर येण्याची वाट पाहात दोन तास थांबावे लागत होते. अशा संघर्षाच्या पार्श्वभूमीवर माझे बालपण गेले आहे.

पालकांच्या बाबतीत बोलायचे तर मी नात्यांमधली गुंतागुंत फार जवळून पाहिली आहे. माझी आई माझ्या वडिलांवर खूप प्रेम करायची आणि माझे वडीलही कुटुंबवत्सल होते. त्यांनी हे प्रेम कधी व्यक्त केले नाही. नात्यांमध्ये तेव्हापासूनच वादळे आलेली पाहिली आहेत. त्यामुळे मी आई-वडिलांपासून तुटल्यासारखा झालो होतो. पण वडील कोमामध्ये गेले तेव्हा आई त्यांच्या डोक्याशी बसून होती. आईने घरी जाण्यासच नकार दिला होता. तेव्हा मला वडिलांविषयी असलेले तिचे प्रेम जाणवले. माझ्या वडिलांनी पहिल्यांदाच तिच्या नावाचा जप सुरू केला होता. तेव्हा मी वडिलांना विचारले की, आयुष्यभर तर तुम्ही तिची पर्वा केली नाही आणि आज तुम्ही तिच्या नावाचा जप का करताहात? त्याच दिवशी मी ठरवले की, माझ्या नावाबरोबर आईचे नाव जोडले जाईल आणि तेव्हापासून मी संजय भन्साळीचा संजय लीला भन्साळी झालो. मला जाणवले की, प्रेम म्हणजे काही मिळवणे नव्हे तर प्रेम म्हणजे समर्पण. प्रेमकथांमध्ये यशस्वी प्रेमापेक्षा समर्पणच खूप महत्त्वाचे आहे. माझ्या वडिलांना जे आयुष्यभर जमले नाही, ते त्यांनी बेेशुद्धावस्थेत सांगितले.

जुने घर आणि जुने दिवस

लहानपणी मी एका खोलीच्या घरात राहिलो. आमचे बेडरूम, हॉल आणि स्वयंपाकघर सारं त्या एका खोलीत होते. अनेक वर्षे माझ्या आईने शिवणकाम केले, जेणेकरून कुटुंबाची गुजराण होऊ शकेल. त्या काळात ती सतत विचारमग्न असायची. त्यामुळेच खामोशी चित्रपटातील सीमा विश्वास जेव्हा दोन्ही मुलांना घेऊन घराघरात जाऊन वस्तू विकण्याचे काम करत असते ते सर्व लोकांना माझ्या लहानपणाशी निगडित वाटले.

माझे बालपण लोकांपासून दूर गेले. मी नेहमीच काहीसा अलिप्त राहायचो. माझी चुलत भावंडं घरी यायची तेव्हा मी त्यांच्याशी बोलत नसे. शाळेतही माझे लक्ष लागत नसे आणि अभ्यासाचे मला फारसे महत्त्व वाटत नव्हते. शाळेतून आल्यावर मला रेडिओ ऐकण्याचा नाद होता. त्यामुळे शाळेतून आलो की मी रेडिओच्या जगात रमण्यास उत्सुक असायचो. मला सतत हे सांगितले जायचे की, चित्रपटांमुळेच आपल्यावर संकटांचा डोंगर कोसळला आहे आणि आपल्याला आर्थिक हलाखीचा सामना करावा लागतो. त्यामुळे आपण अत्यंत वाईट जीवन जगत आहोत. चित्रपट आपल्यासाठी नाहीत. मी हे सर्व ऐकून घ्यायचो. पण दुसरीकडे चित्रपटांचे स्वप्न पाहात होतो. ज्या दुनियेत हेलन नृत्य करत होती आणि दिलीपकुमार डायलॉग म्हणत होते, त्या दुनियेचा एक हिस्सा बनण्यात मला रस होता. मी आजही भुलेश्वरच्या माझ्या जुन्या घरी जातो, जेणेकरून ती परिस्थिती, तिथली हवा पुन्हा अनुभवता यावी. तिथली रिकामी खिडकी पाहतो. माझे बालपण खेळ, मजा, मस्ती आणि गोष्टी, गाणी, गमतीजमती, खोड्या यांनी भरलेले नव्हतेच कधी. उलट गरजा भागवण्यासाठी करावा लागणारा संघर्षच त्यात अधिक होता. मला चित्रपट दिग्दर्शक व्हायचे आहे हे माझ्या मनात केव्हाच पक्के झाले होते.

चित्रपटातील भव्य स्टेज

मला गीत, संगीत यांची समज वडिलांकडून मिळाली आहे. तर नृत्याची समज आईकडून मिळाली आहे. त्यांनीच लोकसंगीताशी माझी ओळख करून दिली. लग्नाआधी माझी आई पी. एल. राज यांच्या मार्गदर्शनाखाली चांगली नृत्यांगना म्हणून कार्यरत होती. पी. एल. राज यांचा बॅले त्या काळात खूपच प्रसिद्ध होता. लहान होतो तेव्हा मी आईला तिच्या गुरुजींकडे नेण्याचा हट्ट करत असे. मला अभ्यास सोडून गुरुजींचा सहायक होण्याची इच्छा होती. कारण त्या काळात तीच एक व्यक्ती मला आवडत होती. मात्र आमच्या त्या वाईट काळात आम्ही खूप छोट्या घरात राहात होतो. आम्हा मुलांना वाढवण्यासाठी आईने नृत्य करणे बंद केले. वास्तविक आईचा नृत्यावर अफाट जीव होता. पण तिला तेच सोडावे लागले. कधी कधी रेडिओ लावून त्या गाण्यांवर ती नृत्य करत असे. तेव्हा घरातलाच टेबल किंवा फर्निचर तिच्या वाटेत अडथळा ठरत असे. घर इतकं छोटं होतं की, तिच्या नृत्यासाठी जागाच नव्हती. त्यावेळी मला नेहमी वाटायचे की, आईला सहजपणे नृत्य करता येईल यासाठी एखादे मोठ्ठे स्टेज असावे. त्यामुळे माझ्या चित्रपटात नायिकांना नृत्य करण्यासाठी खूप मोठे स्टेज मी निर्माण करतो.

माझ्या मते, ज्या स्त्रीची सौदर्याची समज चांगली आहे किंवा जिचे चरित्र मजबूत असते तिचे सौंदर्य चिरकाल टिकले. आजूबाजूला मी अशा अनेक स्त्रिया पाहिल्या आहेत. माझी आजी, आई यांच्यामध्ये हेच गुण असल्याचे पाहिले आहे. ज्या स्त्रिया मजबूत इच्छाशक्तीच्या असतात त्या कधीच परिस्थितीसमोर झुकत नाहीत. परिस्थिती कितीही बिकट बनली तरी त्या डगमगत नाहीत. मला असे वाटते की, एक स्त्री एखाद्या मुलाच्या पालनपोषणाची जबाबदारी समर्थपणे पेलू शकते. स्त्रीमध्ये ती क्षमता, योग्यता निसर्गतःच असते आणि पुरुष या गोष्टी समजू शकण्यास असमर्थच असतो. मी आईला रात्री 2 – 2 वाजता झोपताना पाहिले आहे आणि तेव्हाही ती साडीला फॉल पिको करत असायची. रोज सकाळी ती सहा वाजता उठायची आणि तिसर्‍या मजल्यावरून खाली जाऊन घरात लागणारे पाणी बादल्यांनी भरायची. त्या बादल्यांचे वजन किती असावे हे मी समजू शकतो. आईमुळेच कोणत्याही स्त्रीला समजून घेण्याची क्षमता माझ्यात आली आहे. माझ्या आईची जी परिस्थिती पाहिली तसे चित्रण मी माझ्या चित्रपटात करू शकलोय, असे मला अजूनही वाटत नाही.

आईचे स्वप्न साकार

आईकडे एक पेटी होती, ज्यामध्ये ती नाणी साठवायची आणि सतत ती मोजत राहायची. कारण खूप मेहनतीने तिने हे पैसे मिळवले होते. हीच आठवण मी ‘गुजारिश’ चित्रपटात वापरली आहे, ज्यामध्ये तो मुलगा जादूविषयी सांगतो आणि सगळी नाणी पडू लागतात.

मला वाटतं की, माझे वडील खूप भाग्यवान होते. कारण त्यांना आईची साथ होती. चित्रपटकर्ता म्हणून मी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवावा हे आईचे एक स्वप्न होते. त्यामुळे जेव्हा मला ‘बाजीराव मस्तानी’साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा आईचे स्वप्न साकार झाल्याचे दिसले. आईच्या आशीर्वादाचा परिणाम आपल्या कामावरही होत असतो. आईचा संघर्ष आपल्याबरोबर सुरू राहतो आणि आपल्यामध्ये स्वप्नही पेरतो. त्यामुळे राष्ट्रीय पुरस्कार मिळण्याचा क्षण माझ्यासाठी खूप खास होता.

माझ्या वडिलांचे स्वप्न होते की, मी चित्रपट बनवावेत. पण वडील चित्रपटामुळेच संकटात सापडले होते, याचे दुःख आईला होते. पण आईला हेही माहीत होते की, ‘मुगले आझम’ मी 18 वेळा पाहिला आहे आणि मग मी जेव्हा हा चित्रपट बनवायचा ठरवला तेव्हा तिला खूप आनंद झाला होता.

भुलेश्वरच्या चाळीत राहात होतो तेव्हा तिथे सुखसुविधा नव्हत्या. पण तिथे जीवनगाणे अनुभवता आले. तिथे जीवन काय असते हे कळले. तिथले वातावरण आणि लहानपणी आईने केलेला संघर्ष पाहिल्याचा परिणाम असा झाला की, आज माझे चित्रपट जेव्हा चालत नाहीत, तेव्हा लोक माझ्यावर टीका करतात. पण तरीही मी ताठ मानेने उभा आहे. झुकत नाही. मला माझ्याच नादात काम करत राहायचे आहे.
(शब्दांकन : सुनीता जोशी)

संजय लीला भन्साळी

Back to top button