नाशिक : वैयक्तिक स्वरूपाच्या योजनांचा 40 हजार शेतकर्‍यांना लाभ | पुढारी

नाशिक : वैयक्तिक स्वरूपाच्या योजनांचा 40 हजार शेतकर्‍यांना लाभ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून वैयक्तिक लाभाच्या योजनांचा मोठ्या प्रमाणावर समावेश करण्यात आल्यामुळे नागरिकांचा या योजनेला चांगला प्रतिसाद मिळू लागल्याचे चित्र आहे. फळबाग लागवड योजनेचा 8,933 शेतकर्‍यांनी, गुरांचा गोठा योजनेतून 6,677 पशुपालक शेतकर्‍यांनी लाभ घेतला आहे. रोहयोतून वैयक्तिक स्वरूपाच्या योजनांतून 40 हजार शेतकर्‍यांनी लाभ घेतला आहे.

रोजगार हमी योजना म्हणजे रस्ते, बंधारे या सार्वजनिक स्वरूपाची कामे करून दुष्काळी भागातील मजुरांना रोजगार मिळवून देणारी योजना असे स्वरूप होते. गेल्या वर्षात नाशिक जिल्ह्यात रोजगार हमी योजनेतून 45 हजार 375 कामांपैकी जवळपास 41 हजार नागरिकांना वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ देण्यात आला. यात सर्वाधिक लाभ घरकुल योजनेतील लाभार्थ्यांनी घेतला असून, त्या खालोखाल फळबाग लागवड, गुरांचा गोठा, बांधावरील फळबाग लागवड, सिंचन विहिरी या वैयक्तिक कामांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्याने यंदा प्रथमच रोजगार हमी योजनेतून 101 कोटींची कामे केली असून, त्यातील जवळपास 90 टक्के रक्कम वैयक्तिक लाभांच्या योजनांवर खर्च झाल्यामुळे या योजनेतून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत झाली आहे. यातील 67 कामे वैयक्तिक स्वरूपाची व 197 कामे सार्वजनिक स्वरूपाची अशी एकूण 264 कामे हाती घेण्यात आली होती. वैयक्तिक स्वरूपाच्या कामात वैयक्तिक सिंचन विहिरी, गाय गोठे, कुक्कुटपालन शेड, बांधावर फळबाग लागवड, जुनी भात खाचरे दुरुस्ती, शोषखड्डे, वैयक्तिक शौचालय, शेततळे, दगडी बांध, बांधावर वृक्षलागवड, रेन वॉटर हार्वेस्टिंग, तुती लागवड, विहीर पुनर्भरण, नॅडेप खत, रेशीम लागवड आदी कामांचा समावेश होता. तसेच सार्वजनिक स्वरूपाच्या कामांमध्ये रस्ते तयार करणे, सार्वजनिक शौचालय, पेव्हरब्लॉक, सिमेंट नालाबांध, भूमिगत गटारी, खेळाचे मैदान, सलग समतल चर इत्यादी कामे येतात.

योजना व लाभार्थी संख्या
घरकुल                                21573
फळबाग                               8933
गुरांचा गोठा                          6677
बांधावरील फळबाग लागवड    1338
सिंचन विहिरी                          800
बांधावरील वृक्षलागवड              732
विहीर पुनर्भरण                        260
वैयक्तिक शौचालय                   223
गांडूळ खत                               99

हेही वाचा:

Back to top button