PM Modi : ‘सरकार तरुणांच्या प्रतिभा आणि उर्जेला योग्य संधी देण्यासाठी वचनबद्ध’; 71 हजार कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान | पुढारी

PM Modi : 'सरकार तरुणांच्या प्रतिभा आणि उर्जेला योग्य संधी देण्यासाठी वचनबद्ध'; 71 हजार कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान

पुढारी ऑनलाइन डेस्क : PM Modi : विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आमचे सरकार तरुणांच्या प्रतिभा आणि उर्जेला योग्य संधी देण्यासाठी वचनबद्ध आहे. आज भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. कोविड नंतर संपूर्ण जग मंदीचा सामना करत आहे, बहुतेक देशांची अर्थव्यवस्था सतत घसरत आहे… असे असूनही जग भारताकडे एक उज्ज्वल स्थान म्हणून पाहत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय रोजगार मेळाव्यात तरुणांना मार्गदर्शन करताना म्हटले आहे.

केंद्र सरकारकडून आयोजित राष्ट्रीय रोजगार मेळाव्यात 71 हजार कर्मचाऱ्यांना आज नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या विविध विभागात नोकरी मिळालेल्या तरुणांना आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अभिनंदन केले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधानांच्या उपस्थितीत ही नियुक्तीपत्रे देण्यात आली. यापूर्वी गतवर्षीच्या २२ ऑक्टोबर रोजी रोजगार मेळावा पार पडला होता.

ज्या पदांसाठी नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत, त्यात ट्रेन मॅनेंजर, स्टेशन मास्तर, वरिष्ठ कमर्शियल कम तिकीट क्लार्क, पोलिस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, स्टेनोग्राफर, कनिष्ठ अकाउंटंट, पोस्टल अकाउंटंट, आयकर निरीक्षक, कर सहाय्यक, जेई/सुपरवायझर, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक, ग्रंथपाल, नर्स, प्रोबेशनरी अधिकारी, सहाय्यक, एमटीएस आदी पदांचा समावेश आहे.

यावेळी तरुणांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आजच्या नव्या भारताने अवलंबिले जाणारे नवे धोरण आणि रणनीतीमुळे देशात नवीन शक्यता आणि संधींची दारे खुली झाली आहेत. आज अशी अनेक क्षेत्रे तरुणांसमोर उघडली आहेत, जी 10 वर्षांपूर्वी तरुणांना उपलब्ध नव्हती. स्टार्टअपचे उदाहरण आपल्यासमोर आहे. आज भारतातील तरुणांमध्ये स्टार्टअप्सबाबत प्रचंड उत्साह आहे.

एका अहवालानुसार, स्टार्टअपने 40 लाखांहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. त्याचप्रमाणे ड्रोन क्षेत्र देखील आहे. त्याचबरोबर गेल्या 8-9 वर्षांत देशातील क्रीडा क्षेत्रालाही नवसंजीवनी मिळाली आहे.

आत्मनिर्भर भारत अभियान कोट्यावधी रोजगाराच्या संधी निर्माण करणारी मोहीम

‘आत्मनिर्भर भारत अभियान’चा विचार आणि दृष्टीकोन केवळ स्वदेशी आणि ‘व्होकल फॉर लोकल’ स्वीकारण्यापेक्षा अधिक आहे. ही मर्यादित व्याप्तीची बाब नाही. ‘आत्मनिर्भर भारत अभियान’ ही भारतामध्ये खेड्यापासून शहरांपर्यंत कोट्यावधी रोजगाराच्या संधी निर्माण करणारी मोहीम आहे. देशातील भांडवली खर्च, गेल्या 9 वर्षांत, पूर्वीच्या मूल्याच्या 4 पटीने वाढला आहे. यामुळे रोजगाराच्या संधी तसेच लोकांचे उत्पन्न दोन्ही वाढले आहे.

भारतातील खेळणी उद्योगाचे उदाहरण आपल्यासमोर आहे. अनेक दशकांपासून भारतीय मुले परदेशातून आयात केलेल्या खेळण्यांसोबत खेळत आहेत. ना त्यांचा दर्जा चांगला होता, ना भारतीय मुलांना डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आला होता.

आम्ही आयात केलेल्या खेळण्यांसाठी गुणवत्तेचे मापदंड निश्चित केले आणि आमच्या स्वदेशी उद्योगाला चालना देण्यास सुरुवात केली. 3-4 वर्षात खेळणी उद्योगाला नवसंजीवनी मिळाली आणि रोजगाराच्या अनेक नवीन संधी निर्माण झाल्या.

2014 पूर्वीच्या काळात, सुमारे 20,000 Rkm रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण करण्यासाठी 7 दशके लागली. आणि 2014 नंतरच्या काळात, देशातील सुमारे 40,000 Rkm रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण होण्यासाठी फक्त 9 वर्षे लागली.

आपल्या देशात, संरक्षण उपकरणे फक्त आयात करता येतात, बाहेरूनच आणता येतात, हा दृष्टिकोन अनेक दशकांपासून प्रचलित होता. आम्ही आमच्या देशाच्या निर्मात्यांवर इतका विश्वास ठेवला नाही. आमच्या सरकारने हा दृष्टिकोन बदलला. आमच्या लष्कराने अशा 300 हून अधिक उपकरणे आणि शस्त्रास्त्रांची यादी तयार केली आहे, जी आता भारतात बनवली जातील आणि ती फक्त भारतीय उद्योगांकडूनच विकत घेतली जातील.

रोजगार निर्मितीचा आणखी एक पैलू आहे आणि तो म्हणजे पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये सरकारने केलेली गुंतवणूक. जेव्हा सरकार भांडवली खर्च, रस्ते, रेल्वे, बंदरे यावर खर्च करते तेव्हा अनेक गोष्टी मोठ्या प्रमाणावर तयार होतात. आमच्या सरकारच्या काळात गेल्या ८-९ वर्षात भांडवली खर्च ४ पटीने वाढला आहे. त्यामुळे रोजगाराच्या नव्या संधी आणि लोकांचे उत्पन्न दोन्ही वाढले आहे, असे मोदी यांनी सांगितले.

हे ही वाचा :

PM Narendra Modi: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी भारताकडे मागितली मदत; पीएम मोदींना पत्र

Vande Bharat Express:पीएम मोदींच्या हस्ते राजस्थानमधील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा

Back to top button