नगर : मद्यपी जोमात; प्रशासन कोमात ; चिकूच्या बागेत उच्चभ्रूंसह अधिकार्‍यांची ‘बैठक’ | पुढारी

नगर : मद्यपी जोमात; प्रशासन कोमात ; चिकूच्या बागेत उच्चभ्रूंसह अधिकार्‍यांची ‘बैठक’

पारनेर: पुढारी वृत्तसेवा :  नगर-पुणे महामार्गावर चास कामरगाव घाट परिसरातील अनेक हॉटेलमध्ये बेकायदा मद्यविक्री जोमात सुरू असतानाही प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे. याच भागातील चिकुच्या बागेत “बैठकां’ना बहर आला आहे. ‘पुढारी’च्या वृत्तानंतर थातूरमातूर कारवाई प्रशासनाने केली, मात्र त्यानंंतरही बागेतील ‘बैठका’ पुन्हा सुरू झाल्या आहेत. चुलीवरचे जेवण, गावरान मसाला या नावाखाली बागेत खवय्यांची गर्दी उसळल्याचे चित्र आहे. खवय्यांची ‘सोयपाणी’ होत असल्याने उच्चभ्रूंसह प्रशासनातील अधिकार्‍यांचेही पाय बागेकडे वळल्याचे दिसून येते.

उन्हाच्या चटक्यापासून बचावासाठी बागेतील गारवा बैठकांकडे नगरकरांचा कल वाढला आहे. चिकुची बाग घरगुती पद्धतीने जेवणासाठी परिसरात फेमस झाली आहे. जेवणासोबत राजरोसपणे मद्यपानाची खास सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्याचे दिसून येते. हायवेच्या कडेला असलेल्या बागेतील जेवणासाठी येणार्‍या ग्राहकांच्या कारने पार्किंगही फुल्लं झाल्याचे दिसून येते. झाडांच्या अवतीभोवती टेबल टाकून बैठकीची सोय करून देण्यात आली आहे. ‘बैठकां’मुळे जेवणासाठी आलेल्या फॅमिलीवर मनस्ताप करण्याची वेळ येत असल्याची कुचबुज ऐकू येते. बागेतील जेवणावळीसह बैठकांना कोणी परवानगी दिली, त्याची तपासणी झाली काय? असे प्रश्न आता पुढे येत आहे. छोट्या हातभट्टीवर धाडी टाकणार्‍या यंत्रणेचे बागेतील ‘बैठकांकडे’ मात्र दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.

प्रेमीयुगुलांचे पाय बागेकडे !
बागेत जेवणासाठी येताना कोणतेही निर्बंध नाहीत. प्रशासनही कारवाई करत नाही. त्यामुळे अनेक प्रेमीयुगुलांचे पाय बागेकडे वळाल्याचे दिसून येते.

प्रशासनाला बागेतील जत्रा दिसेना
खास ‘सोयपाणी’ होत असल्याने जत्रेत जमावी तशीच गर्दी बागेत होताना दिसते. प्रशासनातील ‘साहेब’ची बागेतील उठबस पाहता कारवाई करणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. हायवेने अनेक प्रशासकीय अधिकार्‍यांची ये-जा असताना त्यांच्याही नजरेत ‘बागेतील जत्रा’ येत नाही का?, असा सवाल उपस्थित होत आहे.

सुप्यात कारवाई, बागेला ढिलाई
सुपा गावातील हॉटेल वेळेनंतर बंद करण्याचे कठोर पाऊल उचलणार्‍या यंत्रणेला बागेतील उशिरापर्यंत चालणारी उठबस दिसत कशी नाही? असा सवाल नागरिकांतून विचारला जावू लागला आहे.

Back to top button