Nashik : चैत्रोत्सवासाठी लालपरी सज्ज; नांदुरी-सप्तशृंगी गडासाठी जादा बसेस | पुढारी

Nashik : चैत्रोत्सवासाठी लालपरी सज्ज; नांदुरी-सप्तशृंगी गडासाठी जादा बसेस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगगडावरील चैत्रोत्सवाला गुरुवार (दि.३०)पासून प्रारंभ होणार आहे. चैत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ७ एप्रिलपर्यंत गडावर जाण्यासाठी खासगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून १३० जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रोत्सवाच्या काळात गडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदूरी बसस्थानकातूनच सप्तश्रृंगीच्या दर्शनासाठी अर्थात गडासाठी लालपरी सुटणार आहे.

दरवर्षी सप्तश्रृंगगडावर चैत्रोत्सवात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. विशेषत: चैत्रोत्सव यात्रेत खानदेशहून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते. नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून भाविक गडावर दाखल होत असते. भाविकांची संख्या लक्षात घेऊन यात्रोत्सवाच्या काळात जिल्हा प्रशासनाने गडावर येण्या-जाण्यासाठी खासगी वाहनांना बंदी केली आहे. भाविकांना वेळेत व सुलभ दर्शन व्हावे, यासाठी एसटी प्रशासनाने अगोदरपासूनच जादा बसेसचे नियोजन केले आहे.

सप्तशृंगगडावर ३० मार्च ते ६ एप्रिल या कालावधीत चैत्रोत्सव रंगणार आहे. एसटी प्रशासनानेही यात्रा संपेपर्यंत जादा बसेसचे नियोजन केले आहे. ६ एप्रिलला यात्रा संपणार असली तरी, ७ एप्रिलपर्यंत या बसेस सुरू राहणार आहेत. एसटी प्रवासी वाहतूक सेवा चोवीस तास सेवा असणार आहे. भाविकांची गर्दी बघून त्यात वाढही करण्यात येणार आहे. या संपूर्ण यात्रेदरम्यान एसटीचे सुमारे तीनशे कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली.

भाविकांना नांदुरी गाठावी लागणार

सप्तश्रृंगगडासाठी थेट कोणत्याच आगारातून बसेस धावणार नसल्याचे एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आधी भाविकांना खासगी, लालपरी अथवा पर्यायी वाहनाने नांदुरी गाठावी लागणार आहे. त्यानंतर गडावर दर्शनासाठी जाता येणार आहे.

धुळे-जळगावमधून जादा बसेस

चैत्रोत्सवात खानदेशातून येणाऱ्या भाविकांवर सप्तश्रृंगगडावर आदिमायेच्या दर्शनासाठी रीघ लागते. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन धुळे व जळगाव विभागातून जादा बसेस सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही विभागांतून प्रत्येकी सव्वाशे जादा बसेस नांदुरीपर्यंत धावणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button